उद्योगनगरीत पाच वर्षांत केवळ १०८ पुरुषांनी केली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:34 IST2025-08-08T16:33:48+5:302025-08-08T16:34:41+5:30
- नसबंदीबाबत उदासीनता, सक्षम जनजागृतीची गरज

उद्योगनगरीत पाच वर्षांत केवळ १०८ पुरुषांनी केली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया
पिंपरी : शहरात कुटुंब नियोजनासाठी पुरुषांपेक्षा महिलाच अधिक जागृत असल्याचे दिसून येत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या पगड्यामुळे पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविली आहे.
शहरातील महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण अत्यल्प आहे. गैरसमजातून पुरुषांनी नसबंदीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांत फक्त १०८ पुरुषांनी नसबंदी केली आहे.
शहरात गेल्या वर्षभरात ७ हजारांहून अधिक महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली आहे. मात्र, शहरातील अवघ्या २६ पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गैरसमज अन् अनुदान..
डॉक्टरांच्या मतानुसार, आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित गर्भारपण रोखण्यासाठीचा उपाय म्हणजे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया होय. पुरुषांनी नसबंदी केल्यास पुरुषांच्या शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही. शस्त्रक्रिया करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला १ हजार ५०० रुपयांचे अनुदानही सरकारकडून दिले जाते. तरीही गैरसमज, अंधश्रद्धा व महिलांचा विरोध यामुळे पुरुष नसबंदी करत नसल्याचे चित्र आहे.
पुरुष नसबंदी कमी असण्याची कारणे...
- नसबंदीने वंध्यत्व, नपुंसकता येते हा गैरसमज
- स्त्रियांकडून पुरुष नसंबदीला केला जाणारा विरोध
- पुरुष सहजासहजी तयार होत नाहीत
- स्त्रियांनीच नसबदी करावी ही पारंपरिक मानसिकता
- अनेक समाजात पुरुष नसबंदीबाबत अंधश्रद्धा असणे
पुरुष संतती नियमन शस्त्रक्रिया आकडेवारी
वर्ष : शस्त्रक्रिया
२०२०-२१ ०८
२०२१-२२ २१
२०२२-२३ ३०
२०२३-२४ २३
२०२४-२५ २६
एकूण : १०८
गेल्यावर्षी महापालिका रुग्णालय शस्त्रक्रिया
आकुर्डी रुग्णालय - ०३
जिजामाता रुग्णालय – ०५
थेरगाव रुग्णालय - ०१
माऊली हॉस्पिटिल (खासगी) – ०१
स्वर्ण हॉस्पिटल (खासगी) -०२
सांगवी हॉस्पिटल – ०४
यमुनानगर हॉस्पिटल – ०२
भोसरी रुग्णालय – ०१
तालेरा रुग्णालय – ०५
वायसीएम रुग्णालय – ०२
- एकूण - २६
खासगी रुग्णालयांतही सोय
शहरात सरकारी रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालयांतही पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येतात. माऊली हॉस्पिटलमध्ये एक, तर स्वर्ण हॉस्पिटलमध्ये दोन शस्त्रक्रिया गेल्यावर्षी करण्यात आल्या आहेत.
पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेमुळे वंध्यत्व, नपुंसकता येण्याची पुरुषांना भीती असते; पण हा गैरसमज आहे. पुरुषांच्या नसबंदीस अनेकदा घरातून विरोध होतो. अनेक समाजात याबाबत अंधश्रद्धा आहेत. तसेच पुरुषप्रधान संस्कृती याला कारणीभूत आहे. समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका