पिंपरी : आपल्या देशात पिकणारा माल आपल्याच लोकांनी खरेदी करावा, अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या असून अमेरिकन टॅरिफचा फटका बसू नये, यासाठीचे नियोजन सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गृह विभागासोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल. द्राक्ष उत्पादकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी वाकड येथे रविवारी (दि. २४) दिली.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या द्राक्ष परिसंवाद अंतर्गत ६५व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष कैलास भोसले होते. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीय फलोत्पादन विभागाचे उपमहासंचालक संजयकुमार सिंह, कृषी आयुक्त डाॅ. हेमंतकुमार वसेकर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक कौशिक बॅनर्जी, आमदार शंकरराव मांडेकर आदींसह महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, खजिनदार शिवाजीराव पवार, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अभिषेक कांचन उपस्थित होते.
दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्ष संघाच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच सुरेश कळमकर, सचिन सांगळे आणि परदेशी संशोधक कार्लोस फ्लोडी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
केंद्राशी संबंधित विषय मंत्र्यांशी बोलून मार्गी लावू
अजित पवार म्हणाले, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या राज्याशी निगडित मागण्या, समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर केंद्र सरकारशी संबंधित विषय केंद्रीय मंत्र्यांशी बोलून मार्गी लावण्यात येतील.
द्राक्ष बागायतदारांच्या प्रमुख मागण्या
द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी द्राक्ष उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या केल्या. यामध्ये बेदाण्याच्या तस्करीला पायबंद घालावा. शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा. एक रुपयात द्राक्ष पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी. शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा आदी विविध मागण्यांचा समावेश आहे.
मी आधी द्राक्ष बागायतदार आहे, नंतर कृषिमंत्री आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. द्राक्ष उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन आवश्यक ते निर्णय घेतले जातील. शेतमालाच्या मार्केटिंगसाठी कृषी विभाग सतत प्रयत्नशील आहे. - दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री, महाराष्ट्र