- जमीर सय्यदनेहरुनगर : आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका लवकरच होण्याची असल्याने शक्यता शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुक उमेदवार, तसेच आजी-माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांना आपल्या समर्थनार्थ उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये गणेश मंडळांना
मोठ्या प्रमाणावर वर्गणी देऊन कार्यकर्त्यांना खूश करण्याची चढाओढ दिसून येत आहे. परिणामी, यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मंडळांना 'अच्छे दिन' आल्याचे चित्र दिसत आहे.गणेशोत्सव शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे वर्गणीचे महत्त्व प्रचंड आहे. इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांना आपल्या पाठीशी ठेवण्यासाठी मंडळांना मोठ्या रकमेच्या वर्गण्या देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा होणार आहे.
आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सामाजिक उपक्रम, 'चमकोगिरी', तसेच प्रसिद्धीसाठी विविध मार्ग अवलंबले आहेत. प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याने आजी-माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांनी पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरू केली आहे. अनेकांनी नगरसेवकपदाची पाटी आपल्या दारावर लागावी, यासाठी रणशिंग फुंकले आहे. शहर परिसरामध्ये आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.
इच्छुकांना नागरिकांमध्ये प्रसिद्धी, गणेश मंडळांचा फायदागणेश मंडळे मोठ्या वर्गणी देणाऱ्या इच्छुकांना आपल्या अहवालात 'आधारस्तंभ, मार्गदर्शक, संयोजक, युवानेते, भावी नगरसेवक, लोकसेवक, समाजसेवक, दादा, नाना, भाऊ' अशा विविध पदव्यांनी गौरवून त्यांच्या छायाचित्रांसह प्रसिद्धी देत आहेत. त्यामुळे इच्छुकांना नागरिकांमध्ये थेट प्रसिद्धी मिळत असून, कार्यकर्तेही त्यांच्या बाजूने उभे राहत आहेत.
निवडणूक आव्हानात्मकमहापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. चार वार्ड मिळून एक प्रभाग तयार होणार असून, प्रत्येक प्रभागात सुमारे ५० ते ६० हजार मतदार असतील. एवढ्या मोठ्या प्रभागात निवडणूक लढवणे सोपे नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यावर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर गणेश मंडळांमार्फत कार्यकर्त्यांना खूश ठेवण्याची चढाओढ सुरू आहे.