नंदु साळुंके
आकुर्डी : एका १४ वर्षांच्या निरागस जिवासाठी, गुरुवारचा दिवस विसरण्यासारखा ठरला असता; पण एका महिलेच्या मायेच्या हाताने, पोलिस आणि समाजाच्या सहकार्याने तो विसरण्यासारखा नसून, आठवणीत साठवण्यासारखा बनला. स्वारगेट मेट्रो स्थानकावरून चुकून मेट्रोमध्ये चढलेल्या यश अंबादास मिसाळ (वय १४) मुलाच्या चेहऱ्यावर घाबरलेल्या, केविलवाण्या भावनांचे कढ होते; कारण, काही महिन्यांपूर्वीच वडिलांचे निधन झाले होते आणि आई तर त्याच्या आयुष्यात फार पूर्वीच हरवून गेली होती.
या मुलाच्या डोळ्यांतील भीती आणि निराधारपणा आकुर्डीच्या दत्तवाडी परिसरातील पूजा किरण डाखवे यांच्या लक्षात आला. मंगळवारी (दि. २२) संध्याकाळी त्या स्वारगेटहून काम आटोपून पिंपरीसाठी मेट्रोने प्रवास करत होत्या. मेट्रोत दापोडीजवळ या मुलाने विचारले, ‘दीदी, संभाजीनगर कधी येणार ? ’ यावरून काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पूजा यांनी प्रेमाने समजूत घालून विचारपूस केली तेव्हा लक्षात आले की, यश स्वारगेट ते संभाजी उद्यान एवढेच तिकीट घेऊन चुकून चुकीच्या दिशेने मेट्रोमध्ये बसला होता. त्याच्याजवळ घरचा पत्ता, फोन नंबर काही नव्हते; पण एकच माहिती होती, ‘मी लक्ष्मीनगरला राहतो. बाबांना जाऊन तीन महिने झाले, आई लहानपणीच सोडून देवाघरी गेली,’ असे यश सांगत होता. पूजा यांनी तत्काळ स्वारगेट परिसरातील ओळखीचे पोलिस कर्मचारी जितेंद्र गौड यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यामार्फत लक्ष्मीनगरमधील भंगार विक्रेत्याचा नंबर मिळाला. भंगार विक्रेत्याला यशचा फोटो दाखवला असता, ‘हो, हा मुलगा इथेच राहतो,’ असे त्याने सांगितले. त्याच्याच मदतीने यशचे काका व काकू यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
मेट्रोमधील एका प्रवाशाने पिंपरी पोलिस स्टेशनला हरवलेल्या मुलाबाबत कळवले. तातडीने पोलिस कर्मचारी प्रदीप शिंदे व चंद्रकांत देवकते यांनी पिंपरी मेट्रो स्थानक गाठले. अखेर, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर यशच्या काकूंनी पिंपरी मेट्रो स्थानक गाठले. मेट्रो अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत यशला त्याच्या कुटुंबीयांच्या हाती सोपवले.