पिंपरी-चिंचवड – निगडी प्राधिकरण परिसरात चेहऱ्यावर मास्क लावून एक व्यक्ती हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे, या व्यक्तीच्या हातात धारदार शस्त्र असतानाही त्याने कुणालाही इजा केली नाही. त्यामुळे तो प्रँक करत होता की हल्ल्याच्या उद्देशाने फिरत होता, याबाबत संशय व्यक्त केला जात होता. पिंपरीत मास्क मॅनची दहशत अशी प्रतिक्रियाही चर्चेत आलेल्या या व्हिडिओवर होऊ लागली.अधिकच्या माहितीनुसार, या व्हिडीओची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिस तपास पथकाने ब्रह्मा हॉटेल, आकुर्डी परिसरात शोध घेत असता हा इसम शितलादेवी चौक, गोल्डन जिम जवळ दिसला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपले नाव मच्छिंद्र नारायण नवगिरे (वय 68, रा. आकुर्डी गावठाण) असे सांगितले. तो कचरा गोळा करण्याचे काम करतो आणि कचरा गोण्यामध्ये भरण्यासाठी धारदार हत्यार वापरतो, अशी माहिती त्याने दिली. तरीदेखील, नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.