पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतूक व वितरणास आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साइज) मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पुणे राज्य उत्पादन शुल्कच्या जी विभाग कार्यालयाने शुक्रवारी (दि. ९ जानेवारी) पिंपरी परिसरातील पवनेश्वर मंदिराजवळ कारवाई केली. परराज्यातून (दमण) बेकायदेशीररीत्या आणलेले ११२.३२ बल्क लिटर विदेशी मद्य तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले एक चारचाकी वाहन असा एकूण सात लाख २० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध दारू विक्री रोखण्यासाठी पुणे एक्साइजचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. यात पिंपरी येथील पवनेश्वर मंदिराजवळ एक्साइजच्या पथकाने मोठी कारवाई केली. यात बेकायदेशीररीत्या आणलेले ११२.३२ बल्क लिटर विदेशी मद्य जप्त केले. या प्रकरणी एक्साइजच्या जी - १ विभागाचे जवान प्रमोद पालवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक्साइजचे निरीक्षक संजय कोल्हे, दुय्यम निरीक्षक गणेश पठारे, ब्रह्मानंद रेडेकर, जवान समीर बिरांजे, विजय घंदुरे, अमोल कांबळे यांच्यासह एसएसटी पथक तसेच पिंपरी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. एक्साइजच्या जी-१ विभागाचे दुय्यम निरीक्षक अभय औटे तपास करीत आहेत.
निवडणुकीच्या कालावधीत अवैध मद्य वाहतूक, साठवणूक व विक्री यांसह कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर बाबींविरोधात एक्साइजकडून कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अवैध कृतींची माहिती त्वरित संबंधित यंत्रणांना द्यावी व निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Web Summary : Ahead of elections, excise officials seized ₹7.2 lakh worth of illegal foreign liquor and a vehicle near Pimpri's Pavaneshwar Temple. The operation aims to curb illegal liquor trade and maintain law and order during the election period; investigation ongoing.
Web Summary : चुनाव से पहले, आबकारी अधिकारियों ने पिंपरी के पवनेश्वर मंदिर के पास 7.2 लाख रुपये की अवैध विदेशी शराब और एक वाहन जब्त किया। इस कार्रवाई का उद्देश्य चुनाव अवधि के दौरान अवैध शराब के व्यापार को रोकना और कानून व्यवस्था बनाए रखना है; जांच जारी है।