जामीनासाठी PSI ने मागितले २ कोटी, वरिष्ठ अधिकाऱ्याचाही हिस्सा; ४६.५० लाख घेताना पुण्यातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:24 IST2025-11-03T14:20:04+5:302025-11-03T14:24:52+5:30
पिंपरी चिंचवडमध्ये दोन कोटींची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली.

जामीनासाठी PSI ने मागितले २ कोटी, वरिष्ठ अधिकाऱ्याचाही हिस्सा; ४६.५० लाख घेताना पुण्यातून अटक
Crime News: पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षकास तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. प्रमोद रवींद्र चिंतामणी असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील बाणेर येथील एका व्यक्तीला आणि त्याच्या वडिलांना ३ कोटीपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या प्रकरणातील तपास अधिकारी असलेल्या पीएसआयने जामीन मिळवण्यासाठी त्या व्यक्तीच्या वकिलाकडून २ लाख लाच मागितल्याचा आरोप आहे. जेव्हा पीएसआयला कळले की त्या व्यक्तीकडे मोठी रक्कम आहे, तेव्हा त्याने लाचेची रक्कम २ कोटी पर्यंत वाढवली.
या प्रकरणी त्या व्यक्तीच्या वकिलाने २७ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. वकिलाने सांगितले की प्रमोदने ताबडतोब ५० लाख रुपयांची मागणी केली होती आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे आश्वासन दिले होते. तक्रार मिळताच, एसीबीने आरोपी अधिकाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचला. रविवारी, वकिलाला १.५ लाख रुपये आणि ४५ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह पुण्यातील पेठ परिसरात पाठवण्यात आले. ४६.५ लाख रुपयांची लाच घेताना प्रमोद चिंतामणी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून दोन स्मार्टफोन देखील जप्त करण्यात आले. एसीबीने आरोपी अधिकाऱ्याच्या घराचीही झडती घेतली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकिली करतात. त्यांच्या अशिलाविरोधात बावधन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. अशिलाचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतील प्रमोद चिंतामणी हा अधिकारी करत होता. गुन्ह्यात तक्रारदाराच्या अशिलाला मदत करण्यासाठी, तसेच अशिलाचे अटक असलेले वडील यांच्या जामीन अर्जावर 'से' दाखल करण्यासाठी प्रमोद चिंतामणी याने २ कोटींची लाच मागितली होती. सुरुवातीला त्याने २ लाख रुपये मागितले. त्यानंतर अचानक २ कोटींची मागणी केली. तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने शहानिशा करून सापळा रचला. रविवारी (दि.२) चिंतामणी यास उंटाड्या मारुती मंदिरासमोर, रास्ता पेठ येथे तक्रारदाराकडून पहिला हप्ता ४६ लाख ५० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
अशी होती वाटणी
२ कोटी रुपयांपैकी १ कोटी हे आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला, तर १ कोटी स्वतःसाठी मागितल्याचे एसीबीने केलेल्या पडताळणीत समोर आले आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.