प्राध्यापकांचा असहकार; सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये १४ महिन्यांपासून पगारच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:04 IST2017-12-20T19:10:08+5:302017-12-20T20:04:40+5:30
सिंहगड कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगाराच्या मागणीसाठी सोमवार (दि. १८) पासून असहकार आंदोलन सुरु आहे. मागील १४ महिन्यांपासून शिक्षकांना पगारच नसल्याने गुरुजणांवर उपासमारीची वेळ आली आहे.

प्राध्यापकांचा असहकार; सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये १४ महिन्यांपासून पगारच नाही!
लोणावळा : सिंहगड कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगाराच्या मागणीसाठी सोमवार (दि. १८) पासून असहकार आंदोलन सुरु आहे. मागील १४ महिन्यांपासून शिक्षकांना पगारच नसल्याने गुरुजणांवर उपासमारीची वेळ आली आहे.
इमाने इतबारे अध्यापनाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांचे पगार हे २०१२ सालापासून अडकविण्याचे प्रकार सुरु असून ते आजपर्यंत कायम आहे. मागील १४ महिन्यांपासून प्राध्यापकांना पगार नसल्याने शिक्षकांनी संस्थेच्या आवारात असहकार कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
पगार मिळत नसल्याने प्राध्यापक कंगाल झाले आहेत. बँकांकडून, लोकांकडून घेतलेल्या कर्जाची त्यांना परतफेड करता येत नाही म्हणून घरातील दागिने, सोने, चांदी गावाकडील जमीन, घर विकावे लागले आहे. मागील पाच वर्षांपासून प्राध्यापकांचे पगार अडकवून त्यांची पिळवणूक संस्था करत आहे.
या आधी अनेकदा विनंती करून सुदधा पगार होत नसल्याने ते हतबल झाले आहेत. तसेच जे वारंवार पगाराच्या पैशांची मागणी करतात त्यांना कामावरुन कमी करण्याची धमकी दिली जात आहे. अनेकांना आई, वडील, भाऊ यांच्या उपचारांसाठी पैसे लागत आहेत म्हणून १४ नाही तर किमान ७ महिन्यांचा तरी पगार द्या अशी मागणी केली तरीदेखील पगार मिळाला नाही, असे प्राध्यापकांनी सांगितले. अडविलेले पगार तातडीने करा तसेच पुढील पगार नियमीत महिन्याच्या दहा तारखेला द्या अशी मागणी करण्यात आली आहे.