चिमुरड्यांसमोरच गर्भवती पत्नीचा पतीकडून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 21:13 IST2019-08-25T20:52:08+5:302019-08-25T21:13:12+5:30
गर्भवती महिलेच्या गळ्यावर वार करत पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार फुगेवाडी येथे घडली आहे.
_201707279.jpg)
चिमुरड्यांसमोरच गर्भवती पत्नीचा पतीकडून खून
पिंपरी : गर्भवती महिला माहेरी गेली होती. पती आजारी असल्याने ती सासरी आली असता पतीने धारदार शस्त्राने मानेवर वार करून तिचा खून केला. तसेच स्वत:च्या गळ्यावर वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. फुगेवाडी येथे रविवारी (दि. २५) ही घटना घडली. दोन आणि साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यांसमोरच पतीने पत्नीचा खून केल्याने खळबळ उडाली आहे.
भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा प्रवीण घेवंदे (वय २५) असे खून झालेल्या गर्भवतीचे नाव आहे. प्रवीण ऊर्फ गोपाल घेवंदे (वय २८) असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. घेवंदे दाम्पत्य मेहकर, बुलढाणा येथील आहे. सात ते आठ महिन्यांपूर्वी कामानिमित्त ते पुणे येथे आले होते. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथे एका झोपडीत आपल्या दोन मुलांसह ते राहात होते. यातील एक मुलगा साडेतीन तर दुसरा दोन वर्षांचा आहे. घेवंदे बिगारी काम करीत होते.
गर्भवती असलेली पूजा घेवंदे औरंगाबाद येथे आईकडे गेली होती. मात्र पती प्रवीण आजारी असल्योन ती रविवारी (दि. २५) फुगेवाडी येथे आली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास पूजा घरात असताना त्याने पूजाच्या मानेवर धारदार शस्त्राने घाव घालून खून केला. त्यानंतर स्वत:च्या गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला. या वेळी घरात असलेल्या त्यांच्या दोन्ही लहान मुलांनी ही बाब घराबाहेर इतरांना सांगितली. पूजाला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तसेच जखमी प्रवीण याला उपचारासाठी पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.