हिंजवडीत हाॅटेलमधील हुक्का पार्लरमध्ये पोलिसाचा मुलगा; कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Updated: December 16, 2024 18:47 IST2024-12-16T18:47:34+5:302024-12-16T18:47:53+5:30
हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून १८०० रुपये किमतीचे दोन हुक्का पिण्याचे भांडे जप्त केले

हिंजवडीत हाॅटेलमधील हुक्का पार्लरमध्ये पोलिसाचा मुलगा; कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडीपोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये १८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात पोलिसाच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल केला. हिंजवडी येथे ही कारवाई रविवारी (दि. १५) दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
वैभव प्रल्हाद वारडे (३९, रा. गुरुव्दारा रस्ता, आकुर्डी निगडी), हाॅटेलचा व्यवस्थापक सोहम दीपक कदम (२३, रा. वाकड पोलिस लाइन, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार आकाश हंबर्डे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३ (डब्ल्यू)सह १३१ सह सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार वाणिज्य व पुरवठा विनियमन) अनिधिनयमचे कलम ४, ७, २१ व सुधारणा अधिनियम सन २०१८ चे ४ (अ), २१ (अ) अन्वये पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सोहम दीपक कदम हा हाॅटेलचा व्यवस्थापक आहे. त्याचे दिवंगत वडील दीपक कदम हे पोलिस होते. ते वाकड येथील पोलिस वसाहतीमध्ये वास्तव्यास होते. संशयित व्यवस्थापक सोहम कदम आणि वैभव वारडे यांनी त्यांच्या हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर चालवले. याबाबत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली. या कारवाई मध्ये १८०० रुपये किमतीचे दोन हुक्का पिण्याचे भांडे जप्त केले. सहायक पोलिस निरीक्षक पुनम जाधव तपास करीत आहेत.