अनधिकृत आठवडे बाजारातील विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:05 AM2019-02-05T01:05:13+5:302019-02-05T01:05:30+5:30

आठवडे बाजाराच्या नावाखाली भाजी आणि फळविक्रेत्यांनी रावेत प्राधिकरणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठाण मांडले होते.

 Police action on unauthorized weeks market vendors | अनधिकृत आठवडे बाजारातील विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

अनधिकृत आठवडे बाजारातील विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

Next

रावेत - आठवडे बाजाराच्या नावाखाली भाजी आणि फळविक्रेत्यांनी रावेत प्राधिकरणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठाण मांडले होते. हा अनधिकृत बाजार वाहतुकीस अडथळा ठरत होता. त्यामुळे येथे उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत निगडी वाहतूक विभागाने कारवाई केली. विक्रेत्यांना भर चौकात विक्री करण्यास मनाई करून कारवाई करण्यात आली.
विक्रेत्यांनी भर चौकात रस्त्यावरच अनधिकृतपणे आठवडे बाजार भरविण्यास सुरुवात केली होती. बंद सिग्नल यंत्रणा, बेशिस्त वाहनचालक, यामुळे वाहतूककोंडी होते.
रावेत प्राधिकरणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. रस्ता प्रशस्त असूनही आठवडे बाजारामुळे शनिवारी येथे मोठ्या प्रमाणात कोंडी होते.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्ष
वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी चौकातील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु विक्रेते त्यांना कारवाई न करण्याची विनंती करीत होते. वाहतूक विभागाला विक्रेत्यांची हातगाडी अथवा माल जप्त करण्याचे अधिकार नसल्याने कर्मचारी केवळ त्यांना चौकातून हुसकावून लावत होते. अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागास काही नागरिकांनी कळविले. परंतु कोणीही कर्मचारी अथवा अधिकारी फिरकले नाहीत.

शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यापासून रावेत परिसर निगडी वाहतूक विभागास जोडला आहे. रावेत परिसरात होणारी नित्याची वाहतूककोंडी थांबविण्यात आम्हाला यश मिळाले आहे. परंतु प्रत्येक शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजी आणि फळ विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे येथे वाहतूककोंडी होते. त्यामुळे गेल्या शनिवारपासून आमच्या विभागाचे कर्मचारी चौकात विक्रेत्यांना थांबण्यास मज्जाव करीत आहेत.
- अर्जुन पवार, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, निगडी

चौकातील अथवा इतर ठिकाणी होणारे अतिक्रमण काढण्याचे काम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे आहे. विनाअडथळा वाहतूक सुरळीत करणे हे वाहतूक विभागाचे काम आहे. आम्हाला नाईलाजास्तव येथे विक्री करण्यासाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना मज्जाव करावा लागत आहे. आमच्याकडे अधिकार नसल्याने विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करता येत नाही. परंतु वाहतुकीस अडथळा ठरणाºया विक्रेत्यांवर आम्ही दंडात्मक कारवाई करीत आहोत.
- संजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग, निगडी

पूर्ण शहरासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे केवळ एकच पथक उपलब्ध आहे. एका वेळी केवळ आठ ते दहा पोलीस या विभागाकडे उपलब्ध होत असल्याने अनेक ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यास अडचण निर्माण होत आहे. या आठवड्यात अतिक्रमण निर्मूलन पथक ब प्रभागाकडे घेऊन रावेत येथील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.
- सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता,
बांधकाम परवानगी व अतिक्रमण निर्मूलन विभाग, ‘ब’ प्रभाग

Web Title:  Police action on unauthorized weeks market vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.