पीएमआरडीए सपशेल अपयशी; आयटीयन्सची महापालिकेकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:15 IST2025-07-03T10:15:07+5:302025-07-03T10:15:46+5:30
- ‘अनलॉक हिंजवडी’ची सोशल मीडियावर मोहीम : पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, ड्रेनेजच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींवर नव्याने दबाव

पीएमआरडीए सपशेल अपयशी; आयटीयन्सची महापालिकेकडे धाव
पिंपरी : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील नागरी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, ड्रेनेज अशा प्रश्नांकडे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आयटीयन्स, स्थानिक ग्रामपंचायती व नागरिक करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘अनलॉक हिंजवडी आयटी पार्क’ या नावाने सोशल मीडियावर मोहीमही चालवली जात आहे.
पीएमआरडीएच्या अखत्यारीत असलेला हिंजवडी परिसर गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला असला, तरी त्याला अनुसरून सुविधा विकसित झालेल्या नाहीत. मुख्य रस्ते अपुरे, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक वाहतूक सेवेचा अभाव, अनधिकृत बांधकामांचा वाढता प्रश्न आणि नियोजनशून्य विस्तारामुळे येथील समस्या वाढलेल्या आहेत. ग्रामपंचायतींनी वारंवार पीएमआरडीएकडे तक्रारी केल्या असल्या, तरी त्या ऐकल्या जात नाहीत, असा आरोप ग्रामस्थ व ग्रामपंचायती करत आहेत.
माण, जांबे, गहुंजे, सांगवडे या ग्रामपंचायतींनी संयुक्तरीत्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून महापालिकेत समावेश करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेत समावेश झाल्यास शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी निधी, अधिकाऱ्यांची यंत्रणा आणि सेवासुविधा उपलब्ध होतील, असा ग्रामस्थांचा विश्वास आहे. दुसरीकडे, पीएमआरडीएच्या मर्यादित मनुष्यबळामुळे आणि निधीअभावी कामे रखडल्याचेही अधिकारी खासगीत कबूल करत आहेत.
काय आहे ‘अनलॉक हिंजवडी’ मोहीम...
‘अनलॉक हिंजवडी’ मोहिमेच्या माध्यमातून अनेकांनी ‘महापालिकेत समावेश हाच एकमेव उपाय’ अशी भूमिका घेतली आहे. या ऑनलाईन आंदोलनामुळे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींवर नव्याने दबाव निर्माण होताना दिसत आहे. ‘अनलॉक हिंजवडी आयटी पार्क, पीएमआरडीए नको, पीएमसी-पीसीएमसी पाहिजे’ या हॅशटॅग्सचा वापर करत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर नागरिक समस्यांचे फोटो, व्हिडीओ आणि अनुभव शेअर करत आहेत. या मोहिमेला आयटी क्षेत्रातील कर्मचारी, स्थानिक रहिवासी, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत.
जांबे गाव महापालिका हद्दीलगत आहे. परंतु, बकालपणा वाढत असून, वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेले आहे. याबाबत आम्ही प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, दुर्लक्ष होत आहे. नियोजित, सुरक्षित व सुंदर रहिवासी भाग म्हणून विकसित होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत गावाचा समावेश करावा. आयुक्तांनी सरकारकडे पाठपुरावा करावा. - अंकुश गायकवाड, माजी सरपंच, जांबे
पायाभूत सुविधांचा अभाव, सततची वाहतूक कोंडी, पाणी व ड्रेनेज समस्यांनी त्रस्त झालेल्या हिंजवडीकरांचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘अनलॉक हिंजवडी’ ही सोशल मीडिया मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ प्रशासनावर दबाव आणणे नसून, हिंजवडीचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी जनजागृती करणे आहे. - पवनजीत माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्लॉईज