पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल खरेदी-विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; वेपन डीलरच्याही मुसक्या आवळल्या

By नारायण बडगुजर | Published: May 6, 2024 06:45 PM2024-05-06T18:45:59+5:302024-05-06T18:47:28+5:30

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली...

Pistol buying and selling racket busted in Pimpri Chinchwad weapons dealer arrested | पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल खरेदी-विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; वेपन डीलरच्याही मुसक्या आवळल्या

पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल खरेदी-विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; वेपन डीलरच्याही मुसक्या आवळल्या

पिंपरी : वेपन डीलरसह चौघांना अटक करत त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. शहरातील शस्त्रांची बेकायदेशीर खरेदी विक्री यानिमित्ताने मोडून निघाली. अर्जुन भाऊराव सूर्यवंशी (२०, रा. आळंदी), तुषार नथुराम बच्चे (३१, रा. मोशी), कमल रामदास राठोड (२६, रा. नाणेकरवाडी, ता. खेड), अंकित भस्के अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकातील अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर आणि विनोद वीर यांना मरकळ गाव येथे एक गुन्हेगार पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. अर्जुन सूर्यवंशी याला सापळा लावून ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. सूर्यवंशी याच्या विरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने वेपन डीलर अंकित भस्के याच्याकडून हे पिस्तूल विकत आणले असल्याचे सांगितले. सूर्यवंशी याने भस्के याच्याकडून आणखी दोन पिस्तूल आणि काडतूस विकत घेऊन ते सराईत गुन्हेगार तुषार बच्चे याच्याकडे ठेवण्यास दिल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी मोशी येथून बच्चे याला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.

दरम्यान, अंकित भस्के याला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलिसांनी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले. अंकित याने आणखी एक पिस्तूल नाणेकरवाडी येथील कमल राठोड याला विकले होते. पोलिसांनी कमल राठोड याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले. या कारवाईमध्ये दरोडा विरोधी पथकाने सात पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली.

अंकित भस्के हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर येथे गुन्हे दाखल आहेत. अर्जुन सूर्यवंशी आणि तुषार बच्चे याच्या विरोधातही विविध गुन्हे दाखल आहेत. दरोडा विरोधी पथकाने चालू वर्षात पाच कारवायांमध्ये १३ पिस्तूल आणि १३ काडतुसे जप्त केली.  

सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, सागर शेडगे, राहुल खारगे, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, आशिष बनकर, गणेश हिंगे, चिंतामण सुपे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, नागेश माळी, प्रमोद उलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Pistol buying and selling racket busted in Pimpri Chinchwad weapons dealer arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.