तलवार, कोयते नाचवत तोडफोड करणाऱ्या आरोपींची पिंपरी पोलिसांनी काढली ‘धिंड’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 19:52 IST2020-11-03T19:43:58+5:302020-11-03T19:52:23+5:30
तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंट ब्लॉक, विटांनी मारहाण करत १०० जणांच्या टोळक्याने एकावर खुनी हल्ला केला.

तलवार, कोयते नाचवत तोडफोड करणाऱ्या आरोपींची पिंपरी पोलिसांनी काढली ‘धिंड’
पिंपरी : तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंट ब्लॉक, विटांनी मारहाण करत १०० जणांच्या टोळक्याने एकावर खुनी हल्ला केला. नेहरूनगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. ३०) रात्री ही घटना घडली. यातील अटक केलेल्या पाच जणांची पिंपरी पोलिसांनी धिंड काढली.
आशिष जगधने (वय 31), इरफान शेख (वय 30), जितेश मुंजळे (वय 28), जावेद औटी (वय 29), आकाश हजारे (वय 30) यांच्यासह 22 जणांना पोलिसांनीअटक केली आहे. तर 14 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींसह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश सुभाष जाधव (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अटक केलेल्या आरोपींपैकी पाच जणांची पिंपरी पोलिसांनी धिंड काढली. आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी त्यांना घटनास्थळी नेले. पोलिसांनी या घटनेत 17 वाहने जप्त केली आहेत. वाकड पोलिसांनी तोडफोड करणा-या आरोपींची धिंड काढल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पिंपरी पोलिसांनी नेहरूनगर परिसरात तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढली.
---------------------
आरोपींना घटनास्थळी नेऊन पाहणी करणे हा तपासाचा भाग आहे. आरोपी जास्त असल्याने तसेच ते कोणत्या मार्गाने घटनास्थळापर्यंत पोहचले, काय नुकसान केले याची पाहणी करण्यात आली. त्यासाठी आरोपी यांना चालत नेण्यात आले.
- राजेंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पिंपरी