पिंपरी महापालिकेचा मोठा निर्णय: आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना करणार ३ हजारांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 20:47 IST2021-04-15T20:45:27+5:302021-04-15T20:47:49+5:30
पिंपरीतील ४० हजार नागरिकांना फायदा होणार

पिंपरी महापालिकेचा मोठा निर्णय: आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना करणार ३ हजारांची मदत
पिंपरी: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील कुंटुंबाच्या उदरनिवार्हासाठी महापालिकेकडुन तातडीची मदत म्हणून तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. शहरातील बॅचधारक रिक्षाचालक, परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार, नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर यांना मदत केली जाणार आहे. चाळीस हजार नागरिकांना फायदा होणार आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील हातावर पोट असलेल्या लोकांवर आर्थिक संकट ओढवुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ‘‘पारंपारिक व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालविणाºया लोकांचे कोविडमुळे संपुर्ण व्यवसाय उद्वस्त झाले आहेत. अशा अडचणीच्या काळात शहरातील आर्थिकदृष्ट्या खचलेल्या या घटकाला दिलासा देणेसाठी लॉकडाऊन काळात महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत केली जाणार आहे.’’
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘कोरोनामुळे पुढील कालखंडातील निर्बंधामुळे गोरगरीबांची उपासमार होणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील लोकांना मदत करणारी आपली महापालिका राज्यामध्ये पहिलीच महापालिका ठरली असुन मदतीची ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. सुमारे चाळीस हजार नागरिकांना याचा फायदा होणार आहे. ’’
स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे म्हणाले, ‘‘महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये राज्यशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर इ. आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.’’