Pimpri Jumbo Hospital : जम्बो कोविड सेंटरमधील कोरोना मृतांच्या दागिने चोरीच्या घटना सुरूच; आणखी एक गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 16:05 IST2021-05-10T15:58:18+5:302021-05-10T16:05:19+5:30
फिर्यादी यांची आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना नेहरूनगर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.यावेळी त्यांच्या अंगावर १८ ग्राम सोने व चांदी चे दागिने होते.

Pimpri Jumbo Hospital : जम्बो कोविड सेंटरमधील कोरोना मृतांच्या दागिने चोरीच्या घटना सुरूच; आणखी एक गुन्हा दाखल
पिंपरी : पिंपरीतील नेहरूनगर मध्ये असणाऱ्या जम्बो कोविड सेंटरमध्ये मृत कोरोना रुग्णांचे दागिनेचोरीला गेल्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. दागिनेचोरीप्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. मात्र हे प्रकार काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. कोरोना मृताच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा आणखी एक प्रकार सोमवारी (दि.१०) उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरीतील नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये रविवारी (दि. ९) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.
रणवीर जवाहर ठाकूर (वय ३३, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना नेहरूनगर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंगावर ४० हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम सोन्याचे व चांदिचे दागिने होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी फिर्यादीला त्यांच्या आईच्या अंगावर ४० हजार रुपये किमतीचे दागिने मिळून आले नाहीत. कोणीतरी अज्ञात इसमाने ते दागिने चोरून नेले अशी तक्रार फिर्यादीने केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये मृत रुग्णांचे दागिने चोरीला गेल्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. दागिने चोरीप्रकरणी यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.