कर्करोग रुग्णालयाला निविदा प्रक्रियेचा ‘कॅन्सर’;तीनवेळा निविदेला मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:23 IST2025-05-11T14:23:01+5:302025-05-11T14:23:54+5:30
थेरगावमध्ये ३४ गुंठे जागेत सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रुग्णालय उभारण्यात येणार

कर्करोग रुग्णालयाला निविदा प्रक्रियेचा ‘कॅन्सर’;तीनवेळा निविदेला मुदतवाढ
पिंपरी : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले कर्करोग रुग्णालय अद्यापही निविदा प्रक्रियेतच अडकले आहे. थेरगावमध्ये ३४ गुंठे जागेत सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. शभंर खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय असणार आहे. तीनवेळा निविदेला मुदतवाढ दिल्यानंतर एका ठेकेदाराची निविदा महापालिका प्रशासनाने स्वीकारली असून, ती अंतिम टप्प्यात आहे. दोन वर्षांत रुग्णालय सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची वायसीएमसह आठ मोठी रुग्णालये आहेत. मात्र, एकाही रुग्णालयात कर्करोगावरील उपचारासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खासगी रुग्णालयांमधील उपचाराचा खर्च सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून कर्करोग रुग्णालय उभारण्याची मागणी होती. त्यानुसार महापालिकेने थेरगाव नवीन रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या ३४ गुंठे मोकळ्या जागेत रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले.
सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रुग्णालय उभारण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. निविदेला तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतरही एकच ठेकेदार सहभागी झाला. त्यामुळे या ठेकेदाराला काम देण्याचे निश्चित केले. ठेकेदाराला ३० वर्षांसाठी जागा दिली जाणार आहे. ठेकेदाराने दोन वर्षांत ११ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. मशिनरी, मनुष्यबळ, रुग्णालय चालविण्याची जबाबदारी ठेकेदाराची असेल. महापालिका ठेकेदाराला ६० कोटी तफावत निधी देणार आहे.
केमो, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया यांसारख्या कर्करोगाच्या उपचारांव्यतिरिक्त समुपदेशन आणि पुनर्वसन यांसारख्या सहायक सेवाही या रुग्णालयात पुरविण्यात येणार आहेत. हे रुग्णालय स्तन, फुप्फुस, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाची पूर्तता करण्यासाठी सुसज्ज असणार आहे. रुग्णालयात लिनियर एक्सिलेटर्स, ब्रेकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनरची सुविधा देण्यात येणार असल्याची आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
सर्वसामान्यांसाठी उपयुक्त...
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे दर कर्करोग रुग्णालय सुरू झाल्यानंतर महापालिका ठरवेल. त्या दरानुसार दर आकारणी करणे बंधनकारक केले जाणार आहे. महापालिकेने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे दर निश्चित केले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अल्पदरात उपचार मिळणार आहेत.
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दर पडताळणीसाठी प्रस्ताव निविदा समितीकडे पाठविला आहे. त्यानंतर स्थायी समितीची मान्यता घेऊन कामाचा आदेश दिला जाईल. दोन वर्षांत इमारतीचे काम पूर्ण करून रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन आहे.
- लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका