Pimpri Chinchwad: मायलेकींचे हातपाय बांधून ‘वाॅचमन’ने घातला दरोडा, चिखलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 13:14 IST2023-10-12T13:13:11+5:302023-10-12T13:14:26+5:30
बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे मंगळवारी (दि. १०) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली....

Pimpri Chinchwad: मायलेकींचे हातपाय बांधून ‘वाॅचमन’ने घातला दरोडा, चिखलीतील घटना
पिंपरी : एका कुटुंबातील मायलेकींचे हातपाय बांधून त्यांच्या घरातील २३ लाख ६० हजारांचा ऐवज लुटून नेला. यातील धक्कादायक बाब म्हणजे दरोड्यामध्ये कुटुंबाकडे नोकरीस असलेला वॉचमन, त्याची पत्नी, वॉचमनचा भाऊ, वहिनी आणि इतर दोन साथीदारांचा समावेश आहे. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे मंगळवारी (दि. १०) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, संशयित वॉचमन महेश सुनार, त्याची पत्नी लक्ष्मी, त्याचा भाऊ कालू, त्याची पत्नी व इतर दोन साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाॅचमन महेश सुनार हा फिर्यादी तरुणीच्या कुटुंबीयांकडे वॉचमन म्हणून कामाला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास वाॅचमन महेश सुनार याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईला बहाणा करून खाली बोलावले. त्यानंतर बेडशिट आणि ओढणीच्या साहाय्याने त्यांचे हातपाय बांधून ठेवले. ‘अगर मुहसे आवाज निकाला तो जान से मार दुंगा’ अशी धमकी दिली. त्यानंतर महेश सुनार आणि त्याच्या साथीदारांनी घरात जाऊन सोने-चांदी व हिऱ्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण २३ लाख ६० हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच, जाताना पुरावा राहू नये, यासाठी घरातील डीव्हीआरदेखील चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद आहे. संशयितांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये रवाना झाली आहेत.