भोसरी एमआयडीसीत रिमोटद्वारे होणारी वीजचोरी उघडकीस, १९ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:52 IST2025-08-06T15:52:13+5:302025-08-06T15:52:54+5:30
याप्रकरणी संबंधित कंपनीकडून तब्बल १९ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल

भोसरी एमआयडीसीत रिमोटद्वारे होणारी वीजचोरी उघडकीस, १९ लाखांचा दंड वसूल
पिंपरी : भोसरी एमआयडीसी परिसरात दोन वर्षांपासून रिमोटच्या साहाय्याने वीजचोरी करणाऱ्या औद्योगिक ग्राहकावर महावितरणने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीकडून तब्बल १९ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वीजचोरीसाठी वापरलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी वीज वितरणातील हानी कमी करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी वीजचोरी विरोधात मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. गणेशखिंड मंडळाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात सहायक अभियंता गजानन झापे, वीज कर्मचारी हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड व महेश वाघमारे यांचा समावेश होता.
पथकाने भोसरी एमआयडीसीतील गणेश प्रेसिंग या औद्योगिक यंत्रणेची तपासणी केली. त्यावेळी रिमोटद्वारे विद्युत पुरवठा नियंत्रित करून वीजचोरी केली जात असल्याचे आढळून आले. तपासणीत वीजचोरीसाठी वापरलेली उपकरणे जप्त करण्यात आली.
दोन वर्षांत ७७ हजार २७० युनिट वीज चोरी उघड
या ग्राहकाने गेल्या दोन वर्षांत ७७ हजार २७० युनिट वीज चोरी केल्याचे समोर आले. यासाठी त्याच्याकडून १९ लाख १९ हजार ३६२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दोन लाख हजार तडजोड शुल्क आकारण्यात आले.