हिंजवडीचा वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत;महावितरणची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:05 IST2025-07-09T15:04:49+5:302025-07-09T15:05:32+5:30
- ९१ पैकी नऊ उच्चदाब वाहिन्यांवरील दुरुस्ती अद्याप सुरूच

हिंजवडीचा वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत;महावितरणची माहिती
पिंपरी : वीजयंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे हिंजवडी परिसरातील 'इन्फोसिस' आणि 'नेक्स्ट्रा' या कंपन्यांसह ९१ उच्च दाब आणि सुमारे १२ हजार घरगुती ग्राहकांना रविवारी (दि. ६) विस्कळीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला. सोमवारी आणि मंगळवारी वेगाने दुरुस्ती करून ८२ उच्चदाब वाहिन्यांवरील पुरवठा सुरळीत करण्यात आला. नऊ उच्च दाब वाहिन्यांवरील पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापारेषण कंपनीने नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी एक या कालावधीत वीजपुरवठा बंद केला होता. मात्र, देखभाल आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरू करताना 'इन्फोसिस ते पेगासस' या अतिउच्चदाब भूमिगत वीजवाहिनीत दुपारी सव्वादोनच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या हिंजवडी एमआयडीसी आणि आयटी पार्क परिसरातील ९१ उच्च दाब व सुमारे १२ हजार लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतर पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले, असे महावितरणकडून सांगण्यात आले. बिघाड झालेल्या ठिकाणी तत्काळ दुरुस्तीही सुरू करण्यात आली आहे. महावितरणने पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम केले आहे.
अतिउच्चदाब भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये झालेल्या बिघाडामुळे रविवारी एकूण ९१ उच्च दाब आणि सुमारे १२ हजार घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी ५६ उच्च दाब वीजवाहिन्यांवरील ग्राहकांना पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला, तर मंगळवारी २६ उच्च दाब वाहिन्यांवरील पुरवठा सुरळीत करण्यात आला. राहिलेल्या नऊ उच्च दाब केंद्रांवरील काम सुरळीत होण्यासाठी काही काळ लागू शकतो. - विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण