पिंपरी-चिंचवड पोलिस करणार एआय आधारित निगराणी
By नारायण बडगुजर | Updated: January 25, 2026 18:35 IST2026-01-25T18:35:20+5:302026-01-25T18:35:59+5:30
- एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास उच्चस्तरीय समितीची मान्यता

पिंपरी-चिंचवड पोलिस करणार एआय आधारित निगराणी
पिंपरी : गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण आणि सार्वजनिक सुरक्षेला नवे बळ देणाऱ्या एआय आधारित एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी अखेर शासनाच्या उच्चस्तरीय समितीची (एचपीसी) मान्यता मिळाली आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्याने शहराच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी झेप अपेक्षित आहे.
वेगाने नागरिकरण होत असलेले पिंपरी-चिंचवड, वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि आयटी हब यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक संवेदनशील बनत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाने तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगवर भर देत हा शहरव्यापी सीसीटीव्ही प्रकल्प प्रस्तावित केला होता. त्याला मान्यता मिळाली आहे. प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी मिशन आणि महापालिकेमार्फत आधी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे एकाच एकात्मिक प्रणालीत जोडले जाणार आहेत. तसेच, महत्त्वाच्या आणि अद्याप कव्हरेज नसलेल्या भागांत नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. विशेषतः चाकण, तळेगाव आणि भोसरी एमआयडीसी, तसेच हिंजवडी आयटी हब येथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवली जाणार आहे.
देहू व आळंदी या तीर्थक्षेत्रांमध्ये, तसेच सण-उत्सव व पालखी मिरवणुकीदरम्यान गर्दीचे नियोजन आणि वाहतूक नियंत्रणासाठीही प्रकल्पाचा मोठा उपयोग होणार आहे. एआय आधारित प्रगत व्हिडिओ अॅनालिटिक्सच्या साहाय्याने संशयास्पद हालचाली, वाहतूक नियमभंग, गर्दी आणि आपत्कालीन परिस्थितीवर तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये अत्याधुनिक एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन केले जाणार असून, येथील थेट दृश्ये परिमंडळ पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग आणि पोलिस ठाण्यांना उपलब्ध राहणार आहेत. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समिती (पीआयसी) स्थापन केली असून, त्यात महापालिका, पीएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमआयडीसी आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ठळक मुद्दे
-शहरव्यापी एकात्मिक व केंद्रीकृत सीसीटीव्ही व्यवस्था
-एआय-आधारित व्हिडिओ अॅनालिटिक्सचा वापर
-औद्योगिक, आयटी व धार्मिक परिसरांवर विशेष लक्ष
-वाहतूक, गर्दी आणि आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम
एआय-आधारित सीसीटीव्हीचे फायदे
एआय तंत्रज्ञानामुळे संशयास्पद हालचालींची ओळख, वाहतूक नियमभंग शोधणे, गर्दीचा ताण ओळखणे आणि गुन्हे तपासात त्वरित मदत मिळते. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन कारवाई अधिक अचूक होणार आहे.
एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे निगराणी अधिक सक्षमपणे होणार आहे. यातून पोलिसांची कामगिरी आणखी सुधारणार असून, नागरिकांच्या सुरक्षेमध्येही वाढ होणार आहे.
-विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड