रॅम्प तयार, पण संलग्न रस्ता कधी ? चिंचवडकर त्रस्त, भूसंपादन टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 17:23 IST2025-09-14T17:22:38+5:302025-09-14T17:23:56+5:30
- लिंकरोड स्मशानभूमी ते बटरफ्लाय ब्रिजचा मार्ग अपूर्ण : केवळ ८० मीटरचे भूसंपादन नसल्याने १७०० मीटरचा रस्ता रखडला, संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरून लिंक रोडवर येण्यासाठी वळसा

रॅम्प तयार, पण संलग्न रस्ता कधी ? चिंचवडकर त्रस्त, भूसंपादन टांगणीला
पिंपरी : काळेवाडी फाटा ते देहू रस्त्यावरील बीआरटी मार्गावर चिंचवड येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरून लिंक रोडवर येण्यासाठी रॅम्प, चिंचवड-थेरगाव बटरफ्लाय ब्रिज तयार करण्यात आला; मात्र या रॅम्प व ब्रिजला जोडणारा सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता रखडला आहे. या रखडणीत चिंचवड, थेरगाव, काळेवाडी, वाकड परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे रॅम्प तयार, पण संलग्न रस्ता कधी, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
लिंकरोड स्मशानभूमी ते चिंचवडगावातील केशवनगर आणि बटरफ्लाय ब्रिजपर्यंतचा हा रस्ता भूसंपादन प्रक्रियेच्या अडचणींमुळे अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास चिंचवडगाव, केशवनगर, थेरगावसह काळेवाडी फाटा, चिखली, वाकड, रहाटणी आणि चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे. लिंकरोड स्मशानभूमी ते बटरफ्लाय ब्रिजचा मार्ग अपूर्ण असल्याने प्रवाशांना ५-७ किलोमीटर अतिरिक्त अंतर कापावे लागते.
असा आहे रस्ता
लिंकरोड स्मशानभूमी ते चिंचवडगाव विद्युत दाहिनीपर्यंत हा १७०० मीटर लांबीचा रस्ता आहे. मात्र, तानाजीनगर परिसरात केवळ ८० मीटरचे भूसंपादन रखडले आहे. तर या रस्त्यावरील विद्युत दाहिनी ते चिंचवड-थेरगाव बटरफ्लाय ब्रिज असे ७५० मीटरचे अंतर असून त्यापैकी ३० टक्के रस्त्याचे काम झाले असून बाकीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.
रस्ता का रखडला?
हा रस्ता निळ्या पूररेषेत असल्याने जागा मालकांना टीडीआरचा निम्माच मोबदला मिळत असल्याने जागा मालकांचा भूसंपादनाला विरोध आहे. त्यामुळे रस्ता रखडला असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील महत्त्वाच्या रस्त्याच्या भूसंपादनाबाबत आम्ही आढावा घेत असतो. या रस्त्याच्या भूसंपादनाची माहिती घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देणार आहे. - संदेश खडतरे, सहायक संचालक, नगररचना, महापालिका
लिंक रोडवरील रॅम्प व बटरफ्लाय ब्रिजला जोडणारा रस्ता तयार करणे गरजेचे असल्याने नगररचना विभागाकडे जागेची मागणी केली आहे. - चंद्रकांत मुठाळ, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग
शहराचा विकास होत असताना रहदारीच्या दृष्टीने रस्ते होणे गरजेचे आहे. त्यामुळे जागा मालक, लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन यांनी समन्वयातून मार्ग काढणे आवश्यक आहे. - संतोष माचुत्रे, सामाजिक कार्यकर्ते