पीएमआरडीएतर्फे हिंजवडीत १६६ अतिक्रमणांवर हातोडा;वाहतुकीला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 13:43 IST2025-07-23T13:43:43+5:302025-07-23T13:43:58+5:30
हिंजवडी-माण-मारुंजी परिसरात अतिक्रमणे वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी, याचा वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पीएमआरडीएतर्फे हिंजवडीत १६६ अतिक्रमणांवर हातोडा;वाहतुकीला दिलासा
पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठोस कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गेल्या १५ दिवसांत या परिसरातील १६६ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. या भागातील सर्वच अतिक्रमणे काढण्यात येणार असून त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू आहे.
हिंजवडी-माण-मारुंजी परिसरात अतिक्रमणे वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी, याचा वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासह काही ठिकाणी ओढे -नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. या भागातील अतिक्रमणविरोधी मोहिमेअंतर्गत लक्ष्मी चौक, विप्रो सर्कल, माण रोड आदी भागांत पीएमआरडीएने कारवाई करत एकूण १६६ अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे काढली आहेत. त्यामुळे या भागातील रहदारीला यामुळे दिलासा मिळाला आहे.
हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे. या भागात सर्व्हे सुरू असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक अतिक्रमणधारक स्वतःहून अतिक्रमणे काढून घेत प्रशासनाला सहकार्य करत आहे. उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे. संबंधित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार आशा होळकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
या भागातील काढली अतिक्रमणे
-विप्रो सर्कल - १४
-लक्ष्मी चौक ते मेझा नाईन - ३८-माण रोड परिसर - ६६
-लक्ष्मी चौक ते मारुंजी - ७३ (कार्यवाही सुरू)
-माण गाव नाला - २८ (खोल्या निष्कासित)
-हिंजवडी परिसरातील - १९ होल्डिंग निष्कासित
एकूण कारवाई - १६६
अनधिकृत बांधकामांचे सुरू असलेले व नियोजित सर्व्हेची ठिकाणे
-शिवाजी चौक ते स्मशानभूमी रोड
-शिवाजी चौक ते वाकड रोड
-शिवाजी चौक ते फेज १ रोड
-हिंजवडी, माण, मारूंजीसह इतर परिसरात सर्व्हे सुरू