उद्योगनगरीत सहाशेवर जीम, निम्म्या तर अनधिकृत; विनापरवाना व्यायामशाळांचे पेव फुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:59 IST2025-08-07T13:58:46+5:302025-08-07T13:59:39+5:30
- आरोग्यासाठी धोका आणि प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रमाणित प्रशिक्षकांचा अभाव; खराब आणि जुनी उपकरणे

उद्योगनगरीत सहाशेवर जीम, निम्म्या तर अनधिकृत; विनापरवाना व्यायामशाळांचे पेव फुटले
- आकाश झगडे
पिंपरी : शहरात फिटनेसची क्रेझ वाढत असताना, अनधिकृत व्यायामशाळांचेही (जिम) पेव फुटले आहे. गल्लीबोळात कोणत्याही परवानगीशिवाय सुरू झालेल्या या जिम नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करत आहेत. अलीकडे जिममध्ये व्यायाम करत असताना मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जीमची संख्या अंदाजे ४०० ते ६०० असून, त्यात नोंदणीकृत आणि विनानोंदणी अशा दोन्ही प्रकारच्या जिमचा समावेश आहे.
शहरातील गल्लीबोळात सध्या जिमचे फलक दिसत आहेत. मात्र अनेक जिमचालकांकडे कोणतेही परवाने नाहीत. काही जिममध्ये प्रमाणित प्रशिक्षक नाहीत. उपकरणे खराब आणि जुनी आहेत. काहींमध्ये भरमसाट शुल्क आकारणी होते. तिमाही, सहामाही आणि वार्षिक ‘पॅकेज’च्या नावाखाली अवाचे सवा शुल्क घेतले जाते.
जिम सुरू करण्यासाठी लागणारी प्रमाणपत्रे आणि परवाने
व्यवसायाची नोंदणी
कर आणि आर्थिक नोंदणी
स्थानिक परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्र (यात स्थानिक पोलिस, अग्निशमन विभाग आणि महापालिकेकडून आरोग्य आणि स्वच्छता परवाना)
संगीत परवाना
प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे
युवकांमध्ये वाढती क्रेझ
सध्या तरुण पिढीमध्ये सिक्स-पॅक ॲब्स आणि सुडौल शरीरयष्टीची क्रेझ आहे. सर्वच वयोगटांमध्ये फिटनेसचे महत्त्व वाढत आहे. याचा फायदा घेत अनेकजण कमी गुंतवणुकीत जिम सुरू करत आहेत. आकर्षक ऑफर आणि कमी शुल्क आकारून तरुणांना आकर्षित केले जाते.
जिम प्रशिक्षकाची पात्रता काय?
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी
प्रमाणित प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रे : सर्टिफाइड पर्सनल ट्रेनर, सर्टिफाइड फिटनेस ट्रेनर, स्पेशलायझेशन कोर्सेस : वेटलिफ्टिंग, योगा, फंक्शनल ट्रेनिंग, वेट लॉस ट्रेनिंग, सीपीआर आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र (ही सर्व प्रमाणपत्रे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेली असावीत).
आवश्यक कौशल्ये : शरीरविज्ञान आणि पोषणाचे ज्ञान, संवाद कौशल्य
शुल्क आकारणीवर कोणाचे नियंत्रण?
काही ठिकाणी जिममध्ये अवास्तव शुल्क आकारले जात आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मात्र, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहकांना न्याय मिळवण्याचा अधिकार आहे.
परवान्यांचा अभाव, निकृष्ट आणि जुनी उपकरणे
शहरात आवश्यक परवाने नसणाऱ्या अनेक जिम आहेत. अशा जिममध्ये अनेकदा सुरक्षा सुविधांची कमतरता असते. आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेसे नियोजन नसते. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची आणि जुनी उपकरणे वापरली जातात. काही जिममध्ये तर प्रशिक्षित प्रशिक्षक नाहीत, मात्र ‘आमच्याकडून नियमित पाहणी होते’ असे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे म्हणणे आहे. बहुतांश जिम खराब अवस्थेत असल्याने तेथे व्यायाम करणे धोकादायक ठरत आहे.
आमच्या विभागाच्या पर्यवेक्षकांकडून शहरातील जिमची नियमित पाहणी होत असते. - पंकज पाटील, उपयुक्त, क्रीडा विभाग