भामा-आसखेडला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या हटविणार

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 31, 2024 19:20 IST2024-12-31T19:19:20+5:302024-12-31T19:20:17+5:30

महापालिकेने महावितरणला पाठविले पैसे

pimpri chinchwad municipal corporation Electricity lines obstructing Bhama-Aashkhed will be removed | भामा-आसखेडला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या हटविणार

भामा-आसखेडला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या हटविणार

पिंपरी : महापालिकेच्या वतीने खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या योजनेसाठी काम सुरू आहे. त्यासाठी तेथून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या कामास अडथळा ठरत असलेल्या विविध ठिकाणच्या उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहिन्या स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक ते शुल्क महावितरण कंपनीकडे जमा करण्यात आले आहे.

भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. शहरासाठी पाणी आणण्यासाठी धरणाच्या वाकीतर्फे वाडा येथे अशुद्ध पाणी उपसा केंद्रासाठी जॅकवेल आणि पंपिंग स्टेशनचे काम सुरू आहे. तेथून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टाकीपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची भूमिगत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी चाकण वांद्रा रस्ता व कारंजा विहीर येथे महावितरणच्या उच्च व लघुदाब वीज वाहिन्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. त्या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी ३९ हजार ६२३ रुपये पर्यवेक्षण शुल्क महावितरणला देण्यात येणार आहे.

ब्रेक प्रेशर टाकीपासून तळवडे - देहूपर्यंत १४०० मिलिमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या कामासाठी इंदोरी गाव ते जांबवडे गाव ते जाधववाडी धरण रस्तामार्गे नवलाख उंब्रे या ठिकाणी उच्च व लघुदाब वीजवाहिन्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. त्या वाहिन्या हटविण्यासाठी २ लाख ३० हजार ६९१ रुपये पर्यवेक्षण शुल्क महावितरणला देण्यात येणार आहे. हे सर्व शुल्क महावितरणाला अदा करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी, स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानंतर ते शुल्क महावितरणकडे भरण्यात आले आहे.

 
जल उपसा केंद्रासाठी ३ हजार केव्हीए वीज...

भामा-आसखेड धरणाजवळील अशुद्ध जलउपसा केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रास ३ हजार केव्हीएचा वीजभार आवश्यक आहे. त्यासाठी महावितरणला सुरक्षा ठेव, करारनामा शुल्क, सेवा शुल्क, पर्यवेक्षण शुल्क असे एकूण ३ कोटी २२ लाख ७२ हजार ३४५ रुपये शुल्क महावितरण कंपनीने मागितले आहे. त्यापैकी ३ कोटी १० लाख ९१ हजार ३०० रुपये महावितरण कंपनीस बँक गॅरंटी स्वरूपात यापूर्वी देण्यात आले आहेत. उर्वरित ११ लाख ८१ हजार ४५ रुपये देण्यात येणार आहेत.

Web Title: pimpri chinchwad municipal corporation Electricity lines obstructing Bhama-Aashkhed will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.