पावणेनऊ वर्षांनंतर निवडणूक; सर्वच पक्षांचा लागणार कस; पलिकेसाठी महायुतीत रंगणार सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:23 IST2025-12-16T14:10:23+5:302025-12-16T14:23:30+5:30
- महाविकास आघाडीचे नाराजांवर लक्ष : राजकारणातील उलथापालथ, फाटाफूट आणि नव्या आघाड्यांमुळे चित्र पूर्णपणे बदलले

पावणेनऊ वर्षांनंतर निवडणूक; सर्वच पक्षांचा लागणार कस; पलिकेसाठी महायुतीत रंगणार सामना
पिंपरी : महापालिकेची आगामी निवडणूक शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवणारी असेल, असे मानले जात आहे. मागील वेळी म्हणजे २०१७ मध्ये भाजपने स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवत वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, गेल्या पावणेनऊ वर्षांत राज्यातील राजकारणात झालेली उलथापालथ, फाटाफूट, पक्षांतर्गत विभाजन आणि नव्या आघाड्यांमुळे यावेळी राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे.
महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत भाजपने ७७ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला (एकत्रित) ३६, शिवसेनेला (एकत्रित) ९, मनसेला १, तर ६ अपक्ष निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वतंत्र लढल्याने विरोधी मतांचे विभाजन झाले, याचा थेट फायदा भाजपला मिळाला होता. २०१७ चे बलाबल भाजपच्या बाजूने असले, तरी २०२५ मध्ये चित्र वेगळे आहे.
जनसंपर्क तपासून पाहण्याची वेळ
मागील तीन वर्षे महापालिकेचा कारभार प्रशासकांमार्फत सुरू राहिल्याने, माजी नगरसेवकांचा जनतेशी असलेला थेट संपर्क कमजोर झाला आहे. नवीन प्रभागरचना २०१७ सारखीच असली, तरी काही प्रभागांतील वाढलेली मतदारसंख्या, मोठ्या प्रमाणावर झालेल्या मतदारयादीतील घोळांमुळे यावेळी अनेक प्रस्थापित नेत्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे. नवमतदार, आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचा कल कोणत्या बाजूला झुकतो, यावर निकाल अवलंबून राहणार आहे.
स्थानिक मुद्दे निर्णायक ठरणार
यावेळी केवळ पक्ष नव्हे, तर पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची अवस्था, आयटीयन्सचे प्रश्न, औद्योगिक भागातील प्रदूषण, घरकुलवासीयांचे प्रश्न, मालमत्ताकर आणि अनधिकृत बांधकामे हे मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत. महापालिकेत समाविष्ट होऊन दोन दशके उलटल्यानंतर समाविष्ट गावांमधील मूलभूत सुविधा हा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे.
महायुतीतील कोणाची ताकद कोठे?
सध्याच्या निवडणुकीत भाजपसोबत शिंदेसेना मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) वेगळा लढणार आहे. भाजपकडे शहरातील भक्कम संघटन, माजी नगरसेवकांचे जाळे, तसेच रस्ते, मोठे प्रकल्प, स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांचे श्रेय हे मुद्दे आहेत. अजित पवार गटाला पिंपरी, भोसरी, सांगवी, पिंपळे सौदागर, चिखली परिसरातील पारंपरिक राष्ट्रवादीच्या मतदारांचा आधार आहे, तर शिंदेसेनेची ताकद औद्योगिक कामगार, मराठी मतदार आणि जुन्या शिवसैनिकांमध्ये असल्याचे मानले जाते.
महाविकास आघाडी नाराजांना वळवणार का?
महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट), उद्धवसेना आणि काँग्रेस एकत्र येत भाजपविरोधात ताकद उभी करण्याच्या प्रयत्नात आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाकडे जुने नगरसेवक, सहकारी संस्था आणि स्थानिक नेतृत्वाचे जाळे आहे. उद्धवसेनेला मराठी माणसाचा मुद्दा, स्थानिक स्वराज्य संस्थांतील स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करता येणार आहे. काँग्रेसची ताकद मर्यादित असली तरी दलित, अल्पसंख्याक आणि कामगार वस्त्यांमध्ये पक्षाचे प्राबल्य मानले जाते.
२०१७ मधील पक्षीय बलाबल
भाजप - ७७
राष्ट्रवादी काँग्रेस - ३६
शिवसेना - ९
मनसे - १
अपक्ष - ६