प्रभाग १६ मध्ये सर्वाधिक, प्रभाग २३ मध्ये सर्वांत कमी मतदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:59 IST2025-12-16T14:59:06+5:302025-12-16T14:59:40+5:30
- अंतिम मतदार यादी जाहीर : प्रारूप मतदारयाद्यांतील त्रुटी आणि गोंधळ दूर केल्यानंतरचे चित्र

प्रभाग १६ मध्ये सर्वाधिक, प्रभाग २३ मध्ये सर्वांत कमी मतदार
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वाधिक ७५ हजार १०५ मतदार असून, प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वांत कमी ३३ हजार ३३ मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रारूप मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि गोंधळ झाल्याने नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर १० हजारांहून अधिक हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकतींची सखोल तपासणी करत महापालिकेने दुरुस्तीची प्रक्रिया हाती घेतली. संबंधित विभागाने प्रत्येक हरकतीवर काम करून अखेर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे.
दरम्यान, शहरात तब्बल ९२ हजार दुबार मतदार आढळून आले होते. या दुबार नोंदींची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेटी देण्यात आल्या. पडताळणीनंतर चुकीच्या व दुबार नोंदी हटवून मतदारयादी अद्ययावत करण्यात आली आहे. तसेच काही प्रभागांतील मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये नोंदवली गेल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भातही हरकती स्वीकारून आवश्यक दुरुस्त्या करण्यात आल्या. परिणामी, काही प्रभागांतील मतदारसंख्या कमी झाली असून, काही प्रभागांमध्ये मतदारसंख्येत वाढ झाली आहे.
शहरातील मतदारांत ४४ टक्के वाढ
महापालिकेची निवडणूक २०१७ नंतर होत असून, या आठ वर्षांत शहरातील मतदारसंख्येत पाच लाख २० हजार म्हणजे ४४ टक्के वाढ झाली आहे. २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी पिंपरी-चिंचवड शहरात ११ लाख ९२ हजार ८९ मतदार होते, तर आता १७ लाख १३ हजार ८९१ मतदार आहेत. वाढलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवणे, हे सर्वच राजकीय पक्षांसाठी आव्हान ठरणार आहे.