पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: बिगुल वाजले...! ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी रणधुमाळी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:49 IST2025-12-16T13:48:58+5:302025-12-16T13:49:42+5:30
- एकूण मतदार १७ लाख १३ हजार ८९१; चार सदस्यीय प्रभाग रचना; २०४४ मतदान केंद्रे निश्चित; आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: बिगुल वाजले...! ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी रणधुमाळी सुरू
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल सोमवारी (दि. १५) वाजले. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, सुमारे पावणे नऊ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यावेळीही चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे. एकूण ३२ प्रभागांमधून १२८ जागांसाठी ही निवडणूक आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची मागील निवडणूक २१ फेब्रुवारी २०१७ रोजी झाली होती. सभागृहाची मुदत २०२२ मध्ये संपली आहे. आता निवडणूक जाहीर झाली असून, बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक राबविली जाणार आहे. चार सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. प्रत्येक उमेदवारासाठी १३ लाख रुपये खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार असणार आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात एकूण मतदारांची संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ५ हजार ७२८, तर स्त्री मतदार ८ लाख ७ हजार ९६६ आहेत. इतर मतदारांची संख्या १९७ आहे. निवडणुकीसाठी २०४४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये...
प्रभाग १०, १४, १५ व १९ : स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी
प्रभाग १६, १७, १८ व २२ : ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव
प्रभाग २, ६, ८ व ९ : क क्षेत्रीय कार्यालय, पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, एमआयडीसी, भोसरी
प्रभाग २५, २६, २८ व २९ : ड क्षेत्रीय कार्यालय, औंध-रावेत बीआरटी रोड, रहाटणी
प्रभाग ३, ४, ५ व ७ : कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी
प्रभाग १, ११, १२ व १३ : सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, घरकुल चिखली टाऊन हॉल
प्रभाग २१, २३, २४ व २७ : ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर अकादमीच्या मागे, थेरगाव
प्रभाग २०, ३०, ३१ व ३२ : पिंपरी-चिंचवड बॅडमिंटन हॉल, पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी
अंतिम मतदार यादी येथे होणार उपलब्ध
महापालिका मतदार यादी कक्ष : निवडणूक मतदार यादी कक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पहिला मजला, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी
अ क्षेत्रीय कार्यालय : भेळ चौक, निगडी प्राधिकरण, निगडी
ब क्षेत्रीय कार्यालय : पिंपरी चिंचवड लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव
क क्षेत्रीय कार्यालय : नेहरूनगर, पॉलिग्रास ग्राउंडजवळ, एमआयडीसी, भोसरी
ड क्षेत्रीय कार्यालय : औंध-रावेत रोड, रहाटणी
इ क्षेत्रीय कार्यालय : ग्रोथलॅब इमारत, पांजरपोळ समोर, पुणे-नाशिक रोड, भोसरी
फ क्षेत्रीय कार्यालय : नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी
ग क्षेत्रीय कार्यालय : तिसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मागे, थेरगाव
ह क्षेत्रीय कार्यालय : मुलींचे आयटीआय प्रशिक्षण केंद्र, कासारवाडी