राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण; भाजप मात्र ‘एकला चलो’च्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:38 IST2025-12-17T14:37:32+5:302025-12-17T14:38:41+5:30
- उद्योगनगरीत राजकीय हालचालींना वेग : महायुती-महाविकास आघाडीतील इतर पक्ष एकमेकांशी जुळवून घेण्याच्या तयारीत; ठाकरे गट-शरद पवार गट-काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका

राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण; भाजप मात्र ‘एकला चलो’च्या तयारीत
पिंपरी : महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आचारसंहिता लागल्यानंतर अवघ्या काही तासांतच राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि अजित पवार गटातील नेत्यांमध्ये हालचाली सुरू झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीतील नाना काटे आणि सुनील गव्हाणे यांची सोमवारी रात्री भेट झाली. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक आक्रमकपणे मैदानात उतरला असून, पक्ष संघटना सक्रिय करण्यावर भर दिला जात आहे. भाजप आणि शिवसेनेतील काही पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांचे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून घेण्यात आल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे महायुतीतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्येही अस्वस्थता वाढली आहे.
महाविकास आघाडीमध्येही हालचालींना वेग आला आहे. उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असून, जागावाटप, स्थानिक मुद्दे आणि प्रचार रणनीतीवर चर्चा होत आहे. आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली जात असल्याचेही सांगण्यात आले.
एकनाथ शिंदे-अजित पवार गट एकत्र?
शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र येतील का, याबाबतही राजकीय चाचपणी सुरू आहे. दोन्ही पक्षांतील काही पदाधिकाऱ्यांची अनौपचारिक पातळीवर चर्चा आणि संवाद सुरू असल्याची चर्चा आहे. आचारसंहिता लागल्यानंतर सुरू झालेल्या या राजकीय हालचालींमुळे आगामी महापालिका निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपची एकट्याने लढण्याची रणनीती
भाजपने ‘एकला चलो’ची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य मित्रपक्षांचे अनिश्चित धोरण, स्थानिक पातळीवरील अस्वस्थता आणि अंतर्गत गणितांचा विचार करता भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून शहरातील प्रभागनिहाय ताकद, इच्छुक उमेदवारांची संख्या, संघटनात्मक बांधणी आणि मागील निवडणुकांचे निकाल यांचा आढावा घेतला जात आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजपकडे सक्षम उमेदवार उपलब्ध असल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विश्वास पक्षनेतृत्वाकडे असल्याचे सांगण्यात येते.