उपमुख्यमंत्री अजित पवारांचे “मिशन पिंपरी-चिंचवड”; राष्ट्रवादीत इनकमिंगचा महापूर
By किरण शिंदे | Updated: December 16, 2025 18:37 IST2025-12-16T18:34:49+5:302025-12-16T18:37:18+5:30
आज झालेल्या प्रवेश सोहळ्यात स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे “मिशन पिंपरी-चिंचवड”; राष्ट्रवादीत इनकमिंगचा महापूर
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवड शहर भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
आज झालेल्या प्रवेश सोहळ्यात स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच आकुर्डीचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा प्रमुख सागर पुंडे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करून हातात घड्याळ बांधले.

दरम्यान, अजित पवार यांचे ‘मिशन पिंपरी-चिंचवड’ अधिक आक्रमक होताना दिसत असून, महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी सकाळी ८ वाजल्यापासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन, असा ठाम विश्वास अजित पवार यांनी काल व्यक्त केला होता.
याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकूणच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार ताकद एकवटण्यास सुरुवात केली असून, आगामी महापालिका निवडणुकीत शहरात चुरशीची राजकीय लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.