महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी समोरासमोर;स्थानिक नेत्यांच्या आग्रहाला वरिष्ठांचा हिरवा कंदिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:39 IST2025-12-16T15:38:57+5:302025-12-16T15:39:06+5:30
- पिंपरी-चिंचवडमध्ये रंगतदार सामन्याची चिन्हे ; इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या; शिंदेसेना-आरपीयआय भाजपसोबत निवडणूक लढविण्यास तयार

महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी समोरासमोर;स्थानिक नेत्यांच्या आग्रहाला वरिष्ठांचा हिरवा कंदिल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्र लढणार असल्याचे सोमवारी जाहीर होताच इच्छुक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शिंदेसेना आणि आरपीआय (आठवले गट) मात्र भाजपसोबत युतीतून लढणार आहेत. महायुतीतील बलाढ्य घटक पक्ष असलेले भाजप-राष्ट्रवादी समोरासमोर आल्याने रंगतदार सामन्याची चिन्हे आहेत.
महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला ७७, राष्ट्रवादीला ३७ जागा मिळाल्या होत्या, तर पाच अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तत्पूर्वी शिवसेनेत फूट पडली, तर त्यानंतर दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवारांचा गट महायुतीमध्ये सहभागी झाला. पिंपरी-चिंचवड हा २०१७ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता. त्यामुळे आताच्या निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाने जोरदार तयारी केली आहे. दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांचा स्वतंत्र लढण्याचा आग्रह असल्याने वरिष्ठ नेत्यांनीही मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला आहे.
स्थानिकांच्या भूमिकेस नेत्यांचे बळ
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशा आग्रह सुरुवातीपासूनच होता, तर मागील निवडणुकीमध्ये भाजपकडे सर्वाधिक जागा होत्या, त्यामुळे महायुती केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपच्याही स्थानिक नेत्यांनी केली होती. स्थानिकांच्या भूमिकेस वरिष्ठ नेत्यांनी बळ दिले आहे. दोन्ही पक्षांनी १२८ जागांवर तयारी सुरू आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज मागविले असून भाजपकडे ६५०, तर राष्ट्रवादीकडेही मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा देताना ही भूमिका अजित पवार यांनाही मान्य असल्याचे सांगितले.
शिंदेसेना भाजपबरोबर येण्यास तयार
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहेत. मात्र, शिंदेसेना आणि आरपीआय भाजपबरोबर जाण्यास उत्सुक आहे. त्यामुळे आरपीआय आणि शिंदेसेनेला भाजप किती जागा देणार, याबाबतची चर्चा सुरू आहे.
भाजपमध्ये ‘इनकमिंग’ सुरू
बिहारच्या निवडणुकीतील यशानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे. राष्ट्रवादीतील दहा ते बारा माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने मात्र, स्थानिक नेते फुटू नयेत, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आरपीआय आठवले गट भाजपसोबत
महापालिका निवडणुकीसाठी आरपीआय आठवले गट भाजपसोबत राहणार आहे. या पक्षाने पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातून सहा जागांची मागणी केली आहे. त्यांना किती जागा मिळणार, हे नेत्यांच्या चर्चेतून पुढे येणार आहे.