पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : सगळेच राजकीय पक्ष म्हणतात, ‘हम हैं तैयार!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:30 IST2025-12-16T15:29:21+5:302025-12-16T15:30:08+5:30
सर्वच राजकीय पक्षांनी नियोजन सुरू केले आहे. सगळेच राजकीय पक्ष ‘हम हैं तैयार!’ म्हणत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : सगळेच राजकीय पक्ष म्हणतात, ‘हम हैं तैयार!’
पिंपरी : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीतीतील भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर येणार आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळता अन्य पक्षांनी आघाडी करण्यास संमती दिली आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी नियोजन सुरू केले आहे. सगळेच राजकीय पक्ष ‘हम हैं तैयार!’ म्हणत आहेत.
भाजपच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये साडेसहाशे अर्ज आलेले आहेत. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे सज्ज आहे. प्रभागानुसार नियोजन केले आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील. - शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नेते आणि इच्छुकांच्या बैठका सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा गड आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वबळाची पूर्ण तयारी केली आहे. - योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
लोकसभा, विधानसभा आणि पोटनिवडणुकांमध्ये मित्रपक्षांच्या बरोबरीने काँग्रेसने काम केले आहे. या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार १२८ जागांवर नियोजन सुरू केले आहे. आमची स्वबळाची मागणी आहे. - कैलास कदम, शहराध्यक्ष (काँग्रेस)
महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याची शिवसेनेची भूमिका आहे. तयारी सुरू आहे. त्यासाठी शहरातील इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यास प्रतिसाद मिळत आहे. त्यावर मुलाखती घेऊन निर्णय घेतला जाईल. - राजेश वाबळे, शहराध्यक्ष, शिंदेसेना
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. प्रभागनिहाय इच्छुकांची यादी तयार केली आहे. इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविले आहेत. भाजपला थोपवण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी आहे. - तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)
मनसेच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय नियोजन सुरू केले आहे. अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तिन्ही विधानसभा मतदारसंघातील प्रभागांत इच्छुकांच्या बैठका सुरू आहेत. नियोजन सुरू आहे. - सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे
महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढवणार आहोत. इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. १३६ लोकांनी अर्ज नेले आहेत. मनसेही महाविकास आघाडीसोबत आली आहे. त्यामुळे ताकद वाढली आहे. - संजोग वाघेरे, प्रभारी शहरप्रमुख, जिल्हा संघटक, उद्धवसेना
आम्ही भाजपसोबतच असणार आहोत. विधानसभानिहाय दोन-दोन तिकिटांची आम्ही मागणी केली आहे. तसे शहराचे भाजपचे निवडणूकप्रमुख आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना निवेदन दिले आहे. - कुणाल वाव्हळकर, शहराध्यक्ष, आरपीआय.
महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून नियोजन सुरू आहे. १२८ जागा लढविणार आहोत. इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. ७७ अर्ज आले आहेत. आता पुढील नियोजन करत आहोत. - रविराज काळे, शहराध्यक्ष, आप