महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:29 IST2025-11-01T16:29:03+5:302025-11-01T16:29:22+5:30
न्यायालयीन प्रक्रियेमुळे सोडत प्रक्रिया थांबणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला
पिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचनेतील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच खुल्या गटातील महिलांसाठीच्या राखीव जागांसाठी आरक्षण सोडत मंगळवार, दि.११ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूक विभागाला दिले आहेत. त्यामुळे कोणत्या प्रभागात कसे आरक्षण पडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे मंगळवार, दि. ११ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, निवडणूक विभागाकडून याबाबतची सर्व तयारी झाली असून, आता या सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या चार सदस्यीय ३२ प्रभागांची रचना ६ ऑक्टोबरला अंतिम झाली आहे. एकूण १२८ जागा आहेत. ही प्रभागरचना अंतिम करताना सहा प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकसंख्येसह एससी व एसटी लोकसंख्येची आकडेवारी बदलल्याने त्या वर्गाच्या आरक्षणात बदल झाले आहेत. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर प्रभागातील आरक्षण कसे असणार, याची उत्सुकता आहे.
न्यायालयात याचिका दाखल
प्रभागरचना नियमबाह्यपणे फोडण्यात आल्याचा आरोप करत शहरातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, मतदार यादीबाबत शंका घेत काही जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार, त्यानंतर आरक्षण सोडत काढली जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे आरक्षण प्रक्रिया थांबविली जाणार नाही, न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेस स्थगिती दिलेली नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.