रील्स पाहताना हसल्याने मारहाण, दोन सराईतांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:28 IST2025-03-01T13:27:33+5:302025-03-01T13:28:36+5:30
या प्रकरणात संत तुकारामनगर पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक

रील्स पाहताना हसल्याने मारहाण, दोन सराईतांना अटक
पिंपरी : संत तुकारामनगर येथे २५ फेब्रुवारी रोजी रात्री टोळक्याने दोन तरुणांना मारहाण केली. दोन तरुण मोबाईलमध्ये रील्स पाहत असताना हसल्याने हा वाद झाला होता. या प्रकरणात संत तुकारामनगर पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली.
अमन अजीम शेख आणि सिद्धार्थ राजू वाघमारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार दिलेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी सिद्धेश बजरंग सालवी आणि त्याचा मित्र संत तुकारामनगरमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलजवळ गल्लीत मोबाईलमध्ये रील्स पाहत बसले होते. संशयित देखील त्यांच्यापासून काही अंतरावर थांबले होते. दरम्यान, रील्स पाहताना सिद्धेश आणि त्याचा मित्र हसले. या कारणावरून संशयितांनी अचानक दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आठ ते दहाजणांनी दोघांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच संत तुकारामनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
आतापर्यंत या घटनेतील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले आहे. दोन संशयितांना ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुलावरही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. इतर तीन संशयितांची ओळख पटली असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी सांगितले.