मतमोजणी पुढे गेल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली;तळेगावमध्ये राजकीय हवामान ढवळून निघाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:34 IST2025-12-05T16:34:27+5:302025-12-05T16:34:41+5:30
नगराध्यक्षपदाची एक जागा आणि तीन प्रभागांतील नगरसेवकपदाच्या चार जागांसाठी दोन डिसेंबरला मतदान झाले.

मतमोजणी पुढे गेल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली;तळेगावमध्ये राजकीय हवामान ढवळून निघाले
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर संपूर्ण राजकीय हवामान ढवळून निघाले असून, उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. १८ जागा बिनविरोध झाल्याने निवडणुकीतील चुरस कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम मतदानावर झाला. यंदा पुणे जिल्ह्यात सर्वांत कमी ४९.२४ टक्के मतदान तळेगावमध्ये नोंदले गेले.
नगराध्यक्षपदाची एक जागा आणि तीन प्रभागांतील नगरसेवकपदाच्या चार जागांसाठी दोन डिसेंबरला मतदान झाले. तर उर्वरित सहा जागांसाठी पुनर्मतदान २० डिसेंबरला होणार आहे. मात्र, मतमोजणीची तारीख २ डिसेंबरवरून २१ डिसेंबरवर ढकलताच उमेदवार आणि प्रशासन दोघांचीही तयारी कोलमडली आहे.
मतमोजणी उशिरा होणार असल्याने शहरात अफवांना उधाण आले आहे. ईव्हीएममध्ये फेरफार होण्याच्या चर्चा काही उमेदवारांमध्ये रंगू लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी कार्यकर्त्यांकडून मतदानाचा ताळेबंद मागवून ‘आपणच कसे विजयी होऊ’ याची आकडेमोड सुरू केली आहे. कोणत्या प्रभागात किती मतदान झाले, कोणते मतदान लाभदायक, कोणते विरोधकांकडे वळू शकते याचा अंदाज बांधण्याचे सत्र रंगले आहे. वाढलेल्या कालावधीदरम्यान मतदान यंत्रांची कडेकोट सुरक्षा ही प्रशासनाची मोठी जबाबदारी बनली आहे. जवळपास १९ दिवस ईव्हीएमचे रक्षण करावे लागणार असल्याने पोलिसांसह संपूर्ण यंत्रणा अलर्टवर आहे.
मानसिक ताणामध्ये पडली भर
उमेदवार-कार्यकर्त्यांच्या मानसिक ताणातही भर पडली असून, काही समर्थक आगाऊ शुभेच्छा देत असल्याने संभ्रम अधिक वाढत आहे. भेटीगाठी, चर्चासत्रे आणि भविष्यवेध यांचा फड रंगला आहे. दरम्यान, काही प्रभागांत २० डिसेंबरला मतदान होत असल्याने निवडणूक पार पडूनही नेते-कार्यकर्त्यांना शांत बसता येत नाही. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे उमेदवार अद्याप मतदार ताळेबंद मांडण्यात व्यस्त आहेत.
उपनगराध्यक्ष कोण होणार?
नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. परंतु, उपनगराध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक फिल्डिंग लावत आहेत.