पिंपरी : बेवारस मृतदेहाची ओळख पटविली असता, एका तरुणाच्या दूरच्या मामाचा मृतदेह असल्याचे समोर आले. माझ्या मामाला कोणी मारले, असा प्रश्न उपस्थित करत तरुणाने पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. मात्र, त्याच्या पांढऱ्या बुटावर लाल ठिपका दिसला. त्यावरून संशय बळावला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तो ठिपका म्हणजे रक्ताचा डाग असल्याचे समोर आले. त्यावरून क्ल्यू मिळाला अन् खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली.खेड तालुक्यातील रासे गावच्या हद्दीत मुंगसे वस्तीतील ओढ्याच्या जवळ झुडपांमध्ये १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी एक अनोळखी मृतदेह आढळला. मारहाण करून चेहरा छिन्नविछिन्न केला होता. त्यामुळे ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्ना जऱ्हाड यांनी सहकाऱ्यांसह तपासाला सुरुवात केली.पोलिसांसोबत दिवसभर फिरला अन्...मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी परिसरात चौकशी करत असताना एक तरुण पोलिसांकडे आला. माझ्या मामाचा मृतदेह आहे, असे त्याने सांगितले. मामासोबत कोण होते, मामा कुठे गेला होता, कोणासोबत वाद झाला होता का, अशी चौकशी पोलिस करत होते. त्यावेळी संबंधित तरुण पोलिसांसोबत दिवसभर फिरत होता. दरम्यान, तरुणाच्या पायातील बुटावर लाल ठिपका असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक जऱ्हाड यांच्या निदर्शनास आले. तो ठिपका रक्ताचाच असल्याच्या संशयातून त्यांनी चौकशी सुरू केली. तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, तो बोलत नव्हता. पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला.लोकांसमोर अपमान केल्याच्या रागातून रचला कट...खून झालेला व्यक्ती माझा ४० वर्षीय दूरचा मामा होता. तो छोट्या-मोठ्या कारणांवरून लोकांसमोर बोलून माझा अपमान करायचा. तसेच शिवीगाळ करून मारहाण देखील करायचा. त्यामुळे त्याचा मला राग होता. त्यातून त्याचा काटा काढण्याचे ठरविले. त्यासाठी एकांत बघून त्याला कायमचा संपविण्याचा सहा महिन्यांपासून विचार करत होतो. दरम्यान, तो १८ सप्टेंबर २०२४ रोजी मामा दारू पिला होता. त्याला मी निर्जन स्थळी घेऊन गेलो. माझ्या मित्राच्या मदतीने मामाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याचा चेहरा छिन्नविछिन्न करून गळा आवळला. त्यानंतर मृतदेह झुडपात टाकला, असे संबंधित संशयित तरुणाने पोलिसांना सांगितले. संशयित तरुण पोलिसांसोबत फिरत होता. पोलिस ठाण्यात देखील तो आला होता. माझ्या मामाचा खून करणाऱ्यांचा शोध घ्या, असे तो म्हणत होता. मात्र, त्याच्या पायातील बुटावर रक्ताचा डाग दिसला अन् तेथूनच या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलली. पोलिसांच्या कौशल्यपूर्वक तपासामुळे खून प्रकरणाचा काही तासांतच उलगडा झाला. - प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षकसीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइल फोन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा नव्हता. कोणीही साक्षीदार समोर येत नव्हता. त्यामुळे या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान होते. मात्र, संशयित तरुणाच्या पायातील बुटावरील एका लाल डागामुळे संशय बळावला आणि खुनाच्या प्रकरणाचा उलगडा झाला. - प्रसन्न जऱ्हाड, सहायक पोलिस निरीक्षक हॅलो इन्स्पेक्टर कशासाठी?गुन्हेगारांनी कितीही शिताफीने गुन्हा केला, तरी तो पकडला जातोच, हे सर्वांना समजायला हवे. गुन्हा कसा घडू शकतो, हे लक्षात घेऊन आपण सतर्क राहायला हवे आणि एखाद्या गुन्ह्याचा छडा लागतो कसा, हे कळायला हवे. म्हणून खास मालिका आम्ही सुरू केली आहे.-संपादक
Web Summary : A nephew's attempt to feign innocence backfired when a bloodstain on his boot exposed him as his uncle's killer. Spurned by constant public humiliation, he murdered his uncle with a friend, leading to a swift arrest.
Web Summary : मामा की हत्या के मामले में भांजे के जूते पर खून का धब्बा एक महत्वपूर्ण सुराग साबित हुआ। लगातार अपमान से तंग आकर भांजे ने दोस्त के साथ मिलकर मामा की हत्या कर दी, जिससे वह जल्द ही गिरफ्तार हो गया।