पोलिस आयुक्तालयाशेजारच्या चौक्या कुलूपबंद; नागरिकांना गाठावे लागतेय थेट पोलिस ठाणे
By नारायण बडगुजर | Updated: December 11, 2025 17:35 IST2025-12-11T17:33:40+5:302025-12-11T17:35:17+5:30
- चिंचवड, दापोडी व वाकड येथील स्थानिक पोलिसांकडून नागरिकांची सुरक्षा ‘रामभरोसे’

पोलिस आयुक्तालयाशेजारच्या चौक्या कुलूपबंद; नागरिकांना गाठावे लागतेय थेट पोलिस ठाणे
पिंपरी : चिंचवड येथील प्रेमलोक पार्क काॅलनीमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यालय आहे. चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयुक्तालयाची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. मात्र, आयुक्तालय इमारतीच्या परिसरातील पोलिस चौक्या कुलूपबंद आहेत. त्यामुळे नागरिकांना थेट पोलिस ठाणे किंवा आयुक्तालयात धाव घ्यावी लागत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस चौक्यांची ‘लोकमत’ने पाहणी केली. त्यावेळी चिंचवड, दापोडी व वाकड येथील चौक्या बंद होत्या.
सातत्याने होणारी वाहतूककाेंडी, अपघात, तसेच इतर गुन्हे आणि संकट काळात नागरिकांना त्वरित पोलिस मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौक्यांची निर्मिती केली आहे. यातील काही चौक्या कुलूपबंद असतात. त्यामुळे नागरिकांना पोलिस मदत मिळण्यात अडचणी येतात. नागरिकांना पोलिसांशी सहज संपर्क साधता येत नाही. पोलिसांची मदत मिळण्यात अडचणी येतात.
पाेलिस ठाणे २२, चौक्या ४४
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत २२ पोलिस ठाणे आहेत. एका पोलिस ठाण्यांतर्गत सरासरी दोन चौक्या आहेत. या चौक्यांमधून सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी व अंमलदारांचे नियमित कामकाज सुरू असते. तसेच बीट मार्शल व गस्तीवरील पोलिसांनाही जेवण व विश्रांतीसाठी या चौक्यांची मदत होते.
पाहणीत काय आढळले?
-चिंचवड पोलिस ठाण्यांतर्गत चिंचवड-पिंपरी लिंक रस्त्यावर संत मदर तेरेसा उड्डाणपुलाखाली पोलिस चौकी आहे. ‘लोकमत’च्या पाहणीवेळी चौकी बंद होती. अधिकारी कक्षाला कुलूप होते. चौकीच्या परिसरात काही खासगी वाहने पार्क केली होती. चिंचवड ठाण्यांतर्गत वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौकात वाल्हेकरवाडी चौकी आहे. या चौकीतही पोलिस अधिकारी किंवा अंमलदार नव्हते. अधिकारी कक्ष तसेच अंमलदार कक्षालाही कुलूप होते.
- दापोडी पोलिस ठाण्यांतर्गत पुणे-मुंबई महामार्गावर सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर (सीएमई) दापोडी चौकी आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाटा चौकाजवळ कासारवाडी पोलिस चौकी आहे. या दोन्ही चौक्या बंद होत्या. तेथील अधिकारी कक्षांना कुलूप होते.
- वाकड पोलिस ठाण्यांतर्गत मुंबई-बंगळुरू महामार्गावर भुजबळ चौकात उड्डाणपुलाखाली वाकड चौकी आहे. ही चौकी बंद होती. तेथील अधिकारी कक्षालाही कुलूप होते.
...या चौक्यांमध्ये होते कामकाज सुरू
पिंपरी पोलिस ठाण्यांतर्गत पिंपरी रेल्वेस्थानकाजवळील पिंपरी चौकी, मोहननगर चौकी, सांगवी ठाण्यांतर्गत जुनी सांगवी व पिंपळे सौदागर चौकी, काळेवाडी ठाण्यांतर्गत काळेवाडी चौकी, चिखली ठाण्यांतर्गत साने चौक, हिंजवडी ठाण्यांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक, निगडी ठाण्यांतर्गत आकुर्डी, यमुनानगर व निगडी चौकी या ठिकाणी पोलिसांचे कामकाज सुरू होते.
नागरिकांना मदत मिळणार कशी ?
चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस आयुक्तालयाची प्रशासकीय इमारत आहे. त्यामुळे चिंचवड पोलिस ठाण्यातील पोलिसांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. मात्र, पोलिस चौक्या बंद होत्या. चिंचवड, दापोडी व वाकड येथील स्थानिक पोलिसांनी चौक्या वाऱ्यावर सोडल्याचे दिसून आले.
पोलिसांचा ‘प्रेझेन्स’ महत्त्वाचा!
तक्रार अर्ज स्वीकारणे किंवा गुन्हा दाखल करण्याचे कामकाज पोलिस ठाण्यात केले जाते. मात्र, असे असले तरी मुख्य चौक किंवा गजबज असलेल्या परिसरात पोलिसांची उपस्थिती आवश्यक असल्याने पोलिस चौक्या सुरू केल्या आहेत. मात्र, या उद्देशाला हरताळ फासत चिंचवड, दापोडी व वाकड येथील पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

