महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार;भाजप शहराध्यक्षांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:16 IST2025-09-16T16:15:34+5:302025-09-16T16:16:42+5:30
- ३२ प्रभागांत सेवा पंधरावडा कार्यक्रम, नागरिकांशी संवाद साधणार

महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार;भाजप शहराध्यक्षांची माहिती
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून ३२ प्रभागांत १२८ उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. महायुतीपेक्षा आम्ही स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहोत, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पत्रकारांना दिली.
शहराध्यक्ष काटे यांनी रविवारी (दि.१४) पिंपळे सौदागरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. काटे म्हणाले की, महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून संपूर्ण तयारी केली आहे. प्रत्येक प्रभागात बूथनिहाय कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक बूथवर दहा कार्यकर्ते राहणार आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ७७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. यंदाही भाजपने सर्वच जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका निवडणुका महायुतीने एकत्र लढायच्या की नाही, हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र, शहरात आमची संघटनात्मक ताकद भक्कम असून, स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.
काम बघूनच तिकीट दिले जाणार
काटे म्हणाले की, महापालिकेच्या ३२ प्रभागांतील नागरिकांशी भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. आमच्याकडे प्रत्येक प्रभागात पाच ते सात इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, तिकीट वाटप वरिष्ठ पातळीवर होणार आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर संघटनात्मक काम बघूनच तिकीट दिले जात आहे.
सर्वेक्षणामध्ये भाजपला बहुमत
काटे म्हणाले, शहर भाजपच्या वतीने महापालिका सार्वत्रिक निवडणुकीबाबत आतापर्यंत तीनदा सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. यामध्ये ७२ जागांवर आम्ही विजयी होऊ. आता उर्वरित जागांवर कसे जिंकता येईल याकरिता प्रयत्न करावे लागणार आहेत.
पक्षप्रवेश विचार करूनच
काटे म्हणाले की, सध्या विरोधी पक्षातील, तसेच युतीच्या घटक पक्षांतील काहीजण भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. आता पितृपंधरवडा सुरू असून, निवडणुका दिवाळीनंतर होतील. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर विचार करूनच प्रवेश होतील. सर्वांना विश्वासात घेऊनच पक्षप्रवेश केले जातील.