चेंबरमध्ये काम करा, असे आदेश देणारा अधिकारी सापडेल कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:27 IST2025-10-11T15:27:00+5:302025-10-11T15:27:25+5:30
- निगडी प्राधिकरण येथे स्वातंत्र्यदिनादिवशी तीन सफाई कामगार मृत्यू प्रकरण : बीएसएनएलकडे पत्र पाठविले, पोलिसांना मिळेना माहिती, अद्याप तपास सुरूच

चेंबरमध्ये काम करा, असे आदेश देणारा अधिकारी सापडेल कधी?
पिंपरी : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्राधिकरणातील बीएसएनएलच्या चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांचा बळी गेला होता. या घटनेस दोन महिन्यांचा कालखंड होत आला आहे, अजूनही घटनेत मृत्यू व्यक्तींच्या नातेवाइकांना शासनाने भरपाई दिलेली नाही. ठेकेदाराला अटक केली आहे. मात्र, कामाचा आदेश देणाऱ्या बीएसएनएलच्या दोषींवर अजूनही कारवाई झाली नाही. कामाचा आदेश देणारा अधिकारी कोण? हेही सापडलेले नाही.
निगडी प्राधिकरणातील भेळ चौकामध्ये घडलेल्या घटनेनंतर सफाई कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय सफाई आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घेतल्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरली. पंधरा दिवसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर महापालिकेने राष्ट्रीय सफाई आयोगाला पाठवलेल्या अहवालात ठेकेदार आणि बीएसएनएलची चूक असल्याचे नमूद केले आहे. मात्र, महापालिकेने बीएसएनएलच्या विरोधात कोणतेही कडक कारवाईचे पाऊल उचलले नाही.
संबंधित म्हणजे कोण?
राष्ट्रीय सफाई आयोग, अनुसूचित जाती आयोगाने पोलिसांना तंबी दिल्यानंतर पोलिसांनी माहिती पाठवली आहे. त्यामध्ये ठेकेदारावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच बीएसएनएल कंपनीच्या संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संबंधित कोण? याबाबतची माहिती पोलिसांनी आयोगाला दिलेली नाही.
राष्ट्रीय सफाई आयोगाने दखल घेतल्यानंतर महापालिका आणि पोलिस प्रशासन हलले. मृतांच्या नातेवाइकांना शासनाने मदत करायला हवी. महापालिकेनेही मदत द्यावी. कारणीभूत असणाऱ्या ठेकेदार कंपनीस काळ्या यादीत टाकायला हवे. मात्र, अजून कारवाई नाही. गोरगरिबांचे जीव एवढे स्वस्त झाले आहेत का? - सागर चरण, सदस्य, जिल्हा दक्षता समिती
तीन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक केली. तसेच बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले आहे. यासंदर्भात कागदपत्रे मागविण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांच्याकडून अजूनही माहिती उपलब्ध झालेली नाही. - भोजराज मिसाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, निगडी