ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचा आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयावर महामोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 14:15 IST2025-10-09T14:13:37+5:302025-10-09T14:15:24+5:30
या लढ्याला पाठिंबा देणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. वाहतूक कोंडीमुळे चाकणचा श्वास गुदमरतो आहे.

ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचा आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयावर महामोर्चा
पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आपण काम करत असल्याचे सांगत आहे. शेकडो, हजारो कोटींची कामे चाकण एमआयडीसी परिसरात सुरू असल्याचा दावा केला जातो. तरीही चाकणमधील वाहतूक कोंडी आणि इतर समस्या सुटल्याचे दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कामांचा चाकण परिसरातील स्थानिक नागरिक आणि कंपन्यांकडून निषेध करण्यात आला. तसेच आता केवळ आश्वासन नको तर कामे करून दाखवा, अशी आर्त हाक देत ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीतर्फे गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) पीएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिकांचा प्रशासनावरील रोष पाहायला मिळाला.
मोर्चाची सुरुवात चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ल्यापासून झाली. हा मोर्चा तळेगाव चौक, आळंदी फाटा, धर्मवीर स्मारक मोशी, भक्ती शक्ती चौक मार्गे आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयावर पोहोचला. मोर्चात खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे यांच्यासह शेकडो स्थानिक नागरिक आणि कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. चाकण परिसरात १७०० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. पीएमआरडीए स्थापन झाल्यापासून केवळ रुंद रस्त्यांचे आरक्षण कागदावर टाकले आहे प्रत्यक्षात एक दगड देखील टाकला नाही, असा आरोप आंदोलकांनी केला.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, हा नागरिकांनी उभा केलेला लढा आहे. या लढ्याला पाठिंबा देणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. वाहतूक कोंडीमुळे चाकणचा श्वास गुदमरतो आहे. सर्व पीएमआरडीए, पीडब्ल्युडी, महामार्ग प्राधिकरण, महावितरण अशा अनेक संस्था इथे काम करत आहेत. चाकणला मोकळा श्वास मिळावा यासाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. केवळ अतिक्रमण कारवाई करणे हे पीएमआरडीएचे काम नाही. एवढ्या वर्षात केवळ अतिक्रमण काढले असेल तर एवढ्या मोठ्या इमारतीला टाळे ठोकायचे का, असे म्हणत सरकार जनता से डरती है, पुलिस को आगे करती है, असे कोल्हे म्हणाले.