तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्षपद खुले; राजकीय रंगमंचावर नव्या लढतीचे सूर उमटू लागल्याने चुरस वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:02 IST2025-10-07T15:02:34+5:302025-10-07T15:02:56+5:30
नगराध्यक्षपदाचे दार खुला प्रवर्गासाठी उघडले गेल्याने तळेगावच्या राजकीय रंगमंचावर नव्या लढतीचे सूर उमटू लागले आहेत.

तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्षपद खुले; राजकीय रंगमंचावर नव्या लढतीचे सूर उमटू लागल्याने चुरस वाढली
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर होताच स्थानिक राजकारणात नवचैतन्य संचारले आहे. दिग्गज इच्छुकांच्या आशा पुन्हा फुलल्या असून, सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्षपदाचे दार खुला प्रवर्गासाठी उघडले गेल्याने तळेगावच्या राजकीय रंगमंचावर नव्या लढतीचे सूर उमटू लागले आहेत.
नगरपरिषदेची निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून, शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार १४ प्रभागांतून २८ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १३ नगरसेवक, तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समितीने प्रत्येकी ६ नगरसेवक निवडून आणले होते. भाजपच्या चित्रा जगनाडे या जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी जनसेवा विकास समितीने वेळोवेळी बाजू बदलल्याने राजकीय समीकरणे चुरशीची राहिली होती. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी समोरासमोर येणार की भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गटाचा मोठा भाग भाजपमध्ये दाखल झाल्याने आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून मोर्चेबांधणीस सुरुवात झाली असून, संभाव्य उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला जानेवारीअखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने आता निवडणुकीची रणशिंग फुंकली जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण झाल्याने ‘आता संधी सर्वांसाठी समान’ असा आत्मविश्वास स्थानिक इच्छुकांमध्ये दिसून येत आहे. तळेगावच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय एक निर्णायक टप्पा ठरू शकतो.