मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंगचा दुसऱ्या टप्प्यातील खर्च पोहोचला १४२ कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:08 IST2025-07-10T16:08:01+5:302025-07-10T16:08:49+5:30
आठ लाख घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया : ऑक्टोबर २०२६ पर्यंत २०.३५ लाख घनमीटर कचरा हटवणार

मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंगचा दुसऱ्या टप्प्यातील खर्च पोहोचला १४२ कोटींवर
पिंपरी : शहरातील मोशी येथील कचरा डेपोत जमा झालेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वीच्या कचऱ्याच्या डोंगराची बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे विल्हेवाट लावली जाणार आहे. या कामाच्या दुसऱ्या टप्प्यातील खर्च १४२ कोटी ४५ लाखांवर पोहोचला आहे. कचऱ्याचे डोंगर १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नष्ट करण्यासाठी हा वाढीव खर्च करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
संपूर्ण शहराचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोतील ८१ एकर जागेत जमा केला जातो. तेथे २५ ते ३० वर्षांपासून कचरा साचला आहे. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. तो कचरा हटविण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४२ कोटींचा खर्च करण्यात आला. त्यात आठ लाख घनमीटर कचरा हटविण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील १०५ कोटींच्या खर्चाचे काम सुरू आहे. त्याद्वारे १५ लाख घनमीटर कचरा हटविण्यात येत आहे.
कचऱ्याचे बायोमायनिंग म्हणजे काय?
बायोमायनिंग प्रक्रिया म्हणजे अनेक वर्षे कुजलेल्या कचऱ्यापासून निर्माण झालेली माती आणि न जिरणारा कचरा वेगळा करणे. कचऱ्यापासून निर्माण झालेल्या मातीचा खत म्हणून वापर केला जातो, तर न जिरणाऱ्या कचऱ्याचा वापर करून खाणी वा मोठे खड्डे बुजवून जागा पुनर्वापरात आणली जाते.
३७ कोटींनी वाढला खर्च
या कामासाठी महापालिकेस स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत २७ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. बायोमायनिंगद्वारे कचरा डेपोतील आठ एकर जागा मोकळी होणार आहे. त्या जागेत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. ही कामे ऑक्टोबर २०२६ ची मुदत संपण्यापूर्वी पूर्ण करायची आहेत. त्यामुळे महापालिकेने संबंधित दोन ठेकेदारांकडून उर्वरित २५ टक्के वाढीव काम करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी बायोमायनिंगचा खर्च ३७ कोटी ४५ लाख रुपयांनी वाढला आहे. एकूण खर्च १४२ कोटी ४५ लाखांवर पोहोचला आहे. यात एकूण २०.३५ लाख घनमीटर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.