शहरातील मतदार पावणेनऊ वर्षांत पाच लाख २१ हजारांनी वाढले..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:50 IST2025-10-29T13:48:21+5:302025-10-29T13:50:55+5:30
महापालिका निवडणूक : आता शहरात १७ लाख १३ हजार ८९१ मतदार; लोकवस्ती वाढल्याचा आणि नवमतदारांची भर पडल्याचा परिणाम; प्रभागात असणार ४५ ते ५५ हजार मतदारसंख्या

शहरातील मतदार पावणेनऊ वर्षांत पाच लाख २१ हजारांनी वाढले..!
पिंपरी : महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ नंतर पावणेनऊ वर्षांनी होत आहे. त्यावेळेस शहराची मतदारसंख्या ११ लाख ९२ हजार ८९ होती. त्यात आता पाच लाख २१ हजार ८०२ मतदारांची वाढ होऊन ती १७ लाख १३ हजार ८९१ झाली आहे. लोकवस्ती वाढ आणि नवमतदारांची भर यामुळे मतदारसंख्येत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
शहराच्या २०११ च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यावेळेस शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ होती. ही लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मतदारसंख्येतही मोठी वाढ झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादी फोडून १ ते ३२ प्रभागात विभागली जाईल. त्या ३२ मतदार याद्या महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एका प्रभागात ४५ ते ५५ हजार मतदारसंख्या असणार आहे.
अनेक नागरिकांची नावे गोंधळामुळे वगळली
मतदारयादीतील गोंधळामुळे अनेक नागरिकांचे नावे वगळली आहेत. त्यांना आगामी निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही. अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.