भोसरीतील वीज बिघाडाने लघुउद्योग संकटात; लघुउद्योजकांना आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:12 IST2025-07-29T14:11:56+5:302025-07-29T14:12:23+5:30

दोन दिवसांच्या काळात एका प्लास्टिक उद्योगाला सरासरी दीड लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती संबंधित उद्योजकांनी दिली.

pimpari-chinchwad Small industries in crisis due to power failure in Bhosari | भोसरीतील वीज बिघाडाने लघुउद्योग संकटात; लघुउद्योजकांना आर्थिक फटका

भोसरीतील वीज बिघाडाने लघुउद्योग संकटात; लघुउद्योजकांना आर्थिक फटका

पिंपरी : भोसरी एमआयडीसी परिसरात शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. या लपंडावामुळे लघुउद्योजक पुरते हैराण झाले असून, त्यात सर्वाधिक नुकसान प्लास्टिक उद्योगांचे झाले आहे. दोन दिवसांच्या काळात एका प्लास्टिक उद्योगाला सरासरी दीड लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती संबंधित उद्योजकांनी दिली.

महावितरणकडून वेळोवेळी तात्पुरते उपाय केले जातात. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने वीज समस्येचे मूळ प्रश्न सुटत नाहीत, अशी तक्रार लघुउद्योजकांकडून करण्यात आली आहे.

विशेषतः एमआयडीसीमधील टी-ब्लॉक, इंद्रायणीनगर येथील लांडगेनगर भागात शुक्रवारी सकाळपासूनच दिवसभरात तीन ते चारवेळा वीजपुरवठा खंडित झाला. दुसऱ्या दिवशी शनिवारीही सकाळपासून वीज गेली आणि दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत ती पुन्हा आलीच नाही. या काळात प्लास्टिक उद्योगांचे संपूर्ण शिफ्टचे उत्पादन ठप्प झाले. कामगारांना बसून पगार द्यावा लागला, त्यामुळे उद्योगांना आर्थिक फटका बसला.

या आठवड्यात टी-ब्लॉक भागात तीन ते चारवेळा वीजपुरवठा विस्कळीत झाला. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता वीज गायब झाली, तर शनिवारी दिवसभरात तीन ते चारवेळा वीज गेली. या सततच्या वीज खंडितमुळे उद्योजक आणि कामगार दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

महावितरणकडे वीज दुरुस्ती वाहन उपलब्ध असले तरी ते वेळेत पोहोचत नाही किंवा उपयोगात येत नाही, अशीही तक्रार लघुउद्योजकांनी व्यक्त केली आहे. अशा अपुऱ्या सेवा आणि दुर्लक्षामुळे एमआयडीसीतील वीज समस्या अधिकच गंभीर होत चालल्या आहेत. 

सलग दोन दिवस विजेच्या लपंडावाने संपूर्ण शिफ्ट वाया गेल्याने कामगारांना बसून पगार द्यावा लागला. शिवाय उत्पादन ठप्प झाल्याने सरासरी दीड ते दोन लाखांचे नुकसान सहन करावे लागले. आता तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. -नितीन देवकर, श्री जय अंबे एंटरप्रायझेस, लांडगेनगर  
 

आमच्या कंपनीत मशिन टेस्टिंगचे काम केले जाते. त्यासाठी सलग वीज पुरवठा गरजेचा असतो. वीज पुरवठा खंडित झाल्यास पुन्हा पहिल्यापासून काम करावे लागते. या आठवड्यात तीन ते चार वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याने या कामात व्यत्यय आला. -वैभव जगताप, श्री साई एंटरप्रायझेस, टी ब्लाॅक, भोसरी एमआयडीसी 

महावितरणने वीज उपकेंद्रांकडे दुर्लक्ष करू चालणार नाही. जुनी यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे. वीज उपकेंद्रांमध्ये नवीन जीआयएस प्रणालीचा वापर केल्यास वीज समस्या कमी होतील. -संतोष सौंदणकर, माजी सदस्य, विद्युत संनियंत्रण समिती, पुणे 

भोसरी एमआयडीसी टी ब्लॉकमध्ये शुक्रवारी रात्रीपासून विजेचा खेळखंडोबा चालू आहे. रोजच्या विजेच्या लपंडावामुळे वेळेत उत्पादने देता येत नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्यांना नाहक दंडाचा भुर्दंड बसतो. तसेच कामगारांना बसून पगार देण्याची वेळ उद्योजकांवर येते. याची भरपाई महावितरण करणार का? -दुर्गा भोर, अध्यक्षाः पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटना 

भोसरी येथील २२० केव्हीची अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील सीटी (करंट ट्रान्सफाॅर्मर) शुक्रवारी दुपारी चार वाजता फुटला. त्यामुळे ११ वीज वाहिन्या बंद पडल्या. त्यातील ८ वीज वाहिन्या १५ मिनिटांत सुरू झाल्या. तर तीन वाहिन्यांसाठी दीड तासाचा अवधी लागला. त्यामुळे टी ब्लाॅक आणि जे ब्लाॅकचा काही परिसर बाधित झाला होता. तर शनिवारी दोन पीन इन्सुलेटर फुटल्यानेही वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता. - अतुल देवकरः कार्यकारी अभियंता, महावितरण, भोसरी विभाग

Web Title: pimpari-chinchwad Small industries in crisis due to power failure in Bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.