निवडणुकीपूर्वीच स्वयंघोषित भाईंची वळवळ; शहरातील 'गुंडगिरी'ला गावठी कट्ट्याचं बळ
By नारायण बडगुजर | Updated: August 29, 2025 13:26 IST2025-08-29T13:25:08+5:302025-08-29T13:26:45+5:30
- मध्य प्रदेशातून पिस्तुलांची तस्करी : सोशल मीडियावर डायलॉगबाजी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; शस्त्राचा धाक दाखवून दरोडा, लूटमार केल्याचे प्रकार उघड; विशेष मोहिमेत नाकाबंदीमध्ये अवैध शस्त्र जप्त

निवडणुकीपूर्वीच स्वयंघोषित भाईंची वळवळ; शहरातील 'गुंडगिरी'ला गावठी कट्ट्याचं बळ
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच काही स्वयंघोषित भाई 'अॅक्टिव्ह' झाले आहेत. मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी केली जात आहे. निवडणूक काळात त्यांचा वापर करून दहशत पसरविण्याचा कट रचला जात आहे.
खून, खुनाचा प्रयत्न यासह शस्त्राचा धाक दाखवून दरोडा व लुटमारीचे काही प्रकार शहरात घडले. याबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच काही महिन्यांत महापालिका निवडणुका होणार असल्याने यामध्ये वाढ होऊन गल्लीछाप व स्वयंघोषित भाईना ऊत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर नियंत्रणासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून नाकाबंदी करून अवैध शस्त्रे जप्त केली जात आहेत. 'भाईगिरी'ला लगाम घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उद्ध्वस्त, तरी पुरवठा
गावठी पिस्तूल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला. मराठवाडा, खान्देश, पुणे जिल्ह्यातील रॅकेट उद्ध्वस्त झाले. मात्र, त्यानंतरही पिस्तुलांची खरेदी-विक्री सुरूच आहे. थेट मध्य प्रदेशात जाऊन पिस्तूल खरेदी होते. काही एजंट यात कार्यरत आहेत.
चोपडात कारवाई
पिंपरी-चिंचवड शहरातील सहा तरुण उमर्टी येथे पिस्तूल घेण्यासाठी गेले होते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलिसांनी दि. २६ जून रोजी या सहाजणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील कार, मोबाइल आणि इतर साहित्य जप्त केले होते.
पिस्तूल तस्करीचा मार्ग
सातपुडा पर्वताच्या दुर्गम भागात मध्य प्रदेशच्या बडवाणीतील उमर्टी तसेच सिंघाणा गावांमध्ये गावठी पिस्तूल तयार केले जातात. तेथून सेंधवा-शिरपूर-धुळेमार्गे किंवा जळगावातील चोपडामार्गे पिस्तूल तस्करी केली जाते. त्यासाठी बसने उमर्टी गावापर्यंत जाऊन गावठी पिस्तूल खरेदी-विक्री केली जाते.
डायलॉग अन् पिस्तुलाची 'क्रेझ'
काही स्वयंघोषित भाईंकडून सोशल मीडियावर खुन्नस देणारे डायलॉग वापरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जमिनीशी संबंधित वाद, उद्योग-व्यवसाय, पैशांची देवाण-घेवाण, खंडणी, लुटमार करण्यासाठीही गावठी पिस्तूल खरेदी केली जात आहे. यात तरुणांसह अल्पवयीन मुलांचाही सहभाग आहे. काहीजण केवळ 'क्रेझ' म्हणून पिस्तूल खरेदी करत आहेत.
पिस्तूल मिळते २५ हजारांत
मध्य प्रदेशात गावठी कट्टा, पिस्तूल तयार केले जाते. तेथे २० ते २५ हजारांत पिस्तूल मिळते. तेथून विक्रीला शहरात आणण्यासाठी काही एजंट आहेत. शहरात ते पिस्तूल ३५ ते ४० हजार रुपयांना विकले जाते.
बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यात विशेष 'ड्राइव्ह' घेण्यात येत आहे. इतर राज्यातून शहरात शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांवरही 'वॉच' आहे. निवडणूक, सणउत्सव काळा कायदा व सुव्यवस्थेला बाधा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. - विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड