कुत्र्यांच्या चाव्यांनी सांगवीकर हैराण, जिवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:51 IST2025-12-09T16:51:10+5:302025-12-09T16:51:36+5:30
- आठ महिन्यांत हजारांवर नागरिकांना श्वानदंश; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस

कुत्र्यांच्या चाव्यांनी सांगवीकर हैराण, जिवाशी खेळ
सांगवी : शहर अन् लगतच्या परिसरात कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत १ हजार २० नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. श्वानदंशांच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे.
सांगवी परिसरातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांतील श्वानांसह इतर प्राण्यांनी दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. सांगवी येथील इंदिरा गांधी सरकारी रुग्णालयात एकूण एक हजार ४२० रुग्णांपैकी तब्बल एक हजार २० रुग्ण श्वानदंशावर उपचार घेत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या आकडेवारीत पाळीव आणि भटके कुत्र्यांनी घेतलेल्या चावा अशी एकत्रित आकडेवारी आहे.
..
अबालवृद्धांत भीतीचे वातावरण
सध्या इंदिरा गांधी सरकारी रुग्णालयात सांगवी, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे गुरव अगदी पाषाणमधूनही रुग्ण येतात. श्वानदंश केल्यामुळे जखमी झालेल्या रुग्णांत लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांना किंवा मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या पालकांना सतत या मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भीतीचे सावट आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर कुत्र्यांच्या टोळ्या मोकाटपणे वावरत असल्याने परिसरातील नागरिक सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असतानाही या समस्येकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
…………
सातपुडा सोसायटी येथील उद्यान परिसरात श्वानाने दंश केल्याने दीपिका मालगुंडे यांचा ६ वर्षांचा मुलगा जखमी झाला. आज या चिमुकल्याचे शाळेत जाऊ न शकल्याने शैक्षणिक नुकसान तर झालेच शिवाय १२ इंजेक्शन घेऊन शारीरिक त्रासही त्याला भोगावा लागत आहे. कुत्र्याच्या चाव्याने जखमी होताच जीवाच्या आकांताने रडणाऱ्या त्या लेकराने खोलवर झालेली जखम अन्न न थांबणारे रक्त पाहून धास्तावल्या स्वरात विचारलं, ‘आता मी मरणार का गं आई?’ त्या क्षणी त्या आईची मनोवस्था काय झाली असावी, याची आपण कल्पना तरी करू शकतो का? या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे.
---
इंदिरा गांधी प्रसूतिगृह, सरकारी रुग्णालय, सांगवी
---
महिना, श्वानदंश घटना, रुग्ण
एप्रिल ११५ १५०
मे ११९ १६०
जून ११३ १४९
जुलै १४६ २२५
ऑगस्ट १२६ १७६
सप्टेंबर ११२ १६२
ऑक्टोबर १४७ १९२
नोव्हेंबर १४२ २०६
एकूण १०२० १४२०
‘तोडगा काढणार कसा?’
या आकडेवारीत पाळीव प्राण्यांचा दंश आणि भटक्या प्राण्यांचा दंश अशी वर्गवारी होणं गरजेचे आहे. भटक्या श्वानदंशाची संख्या जास्त असल्यास सर्वेक्षण करून पुढील कारवाई केली जाईल. परंतु, संबंधित यंत्रणांनी ही माहिती पशुवैद्यकीय विभागाला द्यायला हवी. आमच्यापर्यंत समस्या आलीच नाही तर त्यावर तोडगा काढणार कसा? - अरुण दगडे,पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका
श्वानदंश तसेच कोणत्याही वन्य किंवा पाळीव प्राण्याने दंश केलेल्या रुग्णांना तातडीने प्रथमोपचार पुरवले जातात. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रेबीज नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून, अशा प्रत्येक रुग्णाला योग्य आणि वेळेत उपचार मिळावेत यावर आमचा विशेष भर असतो. - डॉ. तृप्ती सागळे, रुग्णालयप्रमुख