पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्यातर्फे पुणे महानगर हद्दीतील गावांसाठी मैला व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. खेड, मावळ, मुळशी, हवेली आणि शिरूर या पाच तालुक्यांतील एकूण २७ गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, सिव्हर नेटवर्क आणि संबंधित कामांसाठी तब्बल ९७६ कोटी १७ लाख ७९ हजार ५६६ रुपयांच्या पाच स्वतंत्र निविदा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केल्या आहेत.
या प्रकल्पांतर्गत डिझाइन, पुरवठा, बांधकाम, उभारणी व कार्यान्वयन (डिझाइन- सप्लाय- कन्स्ट्रक्शन- इरेक्शन- कमिशनिंग) यासह पाच वर्षे संचालन व देखभाल (ओ अँड एम) तसेच पाच वर्षांचा डिफेक्ट लायबिलिटी पीरियड (डीएलपी) कंत्राटदारावर राहणार आहे. दीड महिन्याच्या निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदारांची नियुक्ती करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
खेड तालुक्यातील सात गावांसाठी तीन क्लस्टरमध्ये १,३५,१०,१२,८८८ रुपयांची निविदा काढली आहे. मावळ तालुक्यातील दोन गावांसाठी ४,५३,४९,०१६ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. मुळशी तालुक्यातील सहा गावांसाठी २,७२,१३,४८,३४७ रुपयांचा, तर हवेली तालुक्यातील आठ गावांसाठी पाच क्लस्टरमध्ये ३,२०,१६,७८,३८६ रुपयांचा प्रकल्प हाती घेतला जाईल. शिरूर तालुक्यातील चार गावांसाठी २,४४,२३,९०,९२९ रुपयांची निविदा काढली आहे.
या सर्व निविदांची एकत्रित किंमत ९७६ कोटी १७ लाख ७९ हजार ५६६ रुपये इतकी असून, ग्रामीण व उपनगरी भागातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पर्यावरण संवर्धन, भूजल प्रदूषण रोखणे आणि स्वच्छतेच्या दृष्टीने फायदा होणार आहे.
नदी प्रदूषणाला बसणार आळा
या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे मैला व सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडले जाणार नाही. गावांमधील सांडपाणी प्रक्रिया करूनच पुढे सोडण्यात येणार असल्याने पुणे महानगर हद्दीतील नद्यांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांमधील वाढते प्रदूषण लक्षात घेता हे प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत. पर्यावरण संरक्षणासोबतच नदीपात्र आणि भूजल गुणवत्ता सुधारण्यासही या उपक्रमाचा फायदा होईल.
इंद्रायणी, पवना नदी सुधारसाठी लवकरच निविदा
‘पीएमआरडीए’कडून इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्पही हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठीच्या निविदा पुढील आठवड्यात प्रसिद्ध करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास येत्या दोन महिन्यांत नदी सुधार प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Web Summary : PMRDA invests ₹976 crore in sewage treatment plants across five talukas. This initiative aims to improve sanitation, prevent water pollution, and rejuvenate rivers like Indrayani and Pavana. Tenders are announced for 27 villages, promising environmental benefits.
Web Summary : पीएमआरडीए ने पांच तालुकों में सीवेज ट्रीटमेंट प्लांट के लिए ₹976 करोड़ का निवेश किया। इस पहल का उद्देश्य स्वच्छता में सुधार, जल प्रदूषण को रोकना और इंद्रायणी और पवना जैसी नदियों को पुनर्जीवित करना है। 27 गांवों के लिए निविदाएं घोषित, पर्यावरणीय लाभ का वादा।