फिरायला जाणे जीवावर बेतले; कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: April 2, 2025 21:05 IST2025-04-02T21:02:51+5:302025-04-02T21:05:37+5:30
पाय घसरून तो नदीपात्रात तयार झालेल्या नैसर्गिक दगडी कुंडात पडला

फिरायला जाणे जीवावर बेतले; कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
पिंपरी : देहूरोडजवळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २ एप्रिल) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. अमन शफी अन्सारी (२०, कुदळवाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन बुधवारी कुंडमळा येथे चार मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता. कुंडमळा येथे एका काठावरून दुसऱ्या काठावर जात असताना पाय घसरून तो नदीपात्रात तयार झालेल्या नैसर्गिक दगडी कुंडात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या दोन मित्रांनी कुंडात उडी मारली. मात्र, त्या मित्रांना पोहता येत नव्हते.
स्थानिक नागरिकांनी दोन मित्रांना बाहेर काढले. त्यानंतर रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेचे नीलेश गराडे, भास्कर माळी, गणेश गायकवाड, रवी कोळी, विनय सावंत, सागर भेगडे, अनिश गराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्धा तास शोध घेत अमन याचा मृतदेह कुंडातून बाहेर काढण्यात आला.