हिंजवडीतील बेकायदा डम्पर, टिपर वाहतुकीला पाठबळ कोणाचे ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:45 IST2025-10-11T09:45:28+5:302025-10-11T09:45:52+5:30
रस्त्याची दुरवस्था आणि अवजड वाहनांचा वेग ठरतोय कर्दनकाळ..! आयटीत अपघाताचे सत्र सुरूच ; ठोस उपाययोजना गरजेच्या

हिंजवडीतील बेकायदा डम्पर, टिपर वाहतुकीला पाठबळ कोणाचे ?
- रोहिदास धुमाळ
हिंजवडी : आयटी परिसरात होणारी दगड, खडी, माती, डबर त्याचबरोबर सिमेंट रेडिमिक्सची वाहतूक सध्या इतर वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. भरघाव वेगाने वाहने दामटली जात आहेत, मात्र, पोलिस त्याकडे डोळेझाक करीत आहेत. हिंजवडीतील बेकायदा डम्पर, टिपर वाहतुकीला पाठबळ कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिंजवडीत गेल्या महिनाभरात अवजड वाहनांच्या धडकेत दोन जणांचा बळी गेला आहे. हिंजवडीहून माणच्या दिशेला जाणाऱ्या मिक्सरच्या धडकेत भारती मिश्रा यांचा जीव गेला. अपघातानंतर हिंजवडी पोलिसांनी वाहन आणि चालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आजच्या अपघात घटनेमुळे, अवजड वाहनांचा वेग आणि वर्दळीच्या रस्त्यावरून होणारी अवैध वाहतूक आणि त्यातून होणारे अपघात हा विषय ऐरणीवर आला आहे.
१) अवजड वाहनांमधून रस्त्यावर पडणारी खडी, वाळू आणी डबरमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. त्यात, खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वर्दळीच्या रस्त्यावरून धावणारी सुसाट अवजड वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.
२) माण - हिंजवडीसह आयटीपरिसरात दररोज शेकडो अवजड वाहनांची प्रमुख रस्त्यावर दिवसरात्र रेलचेल असते. संबंधित वाहनांची वेग मर्यादा, पीकअवरला असणाऱ्या बंदीचे पालन, वाहनाची आवश्यक कागदपत्रे आणी चालक यांची प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलिस यांच्या मार्फत कसून तपासणी होणे गरजेचे आहे, अशी मागणी आयटी परिसरातील नागरिक करत आहेत.
बंदी फक्त कागदावरच ...!
नांदे, म्हाळुंगे, बालेवाडी तसेच, हिंजवडी आयटीनगरी परिसरात विविध नामांकित गृहप्रकल्प सुरू आहेत. यासाठी, मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन आणी कच्च्या मालासह सिमेंट रेडिमिक्सची वाहतूक सुरू असते. त्यामुळे, आयटी परिसरात सर्वच प्रमुख रस्त्यांवर दिवसरात्र ट्रॅक्टर, डम्पर, मिक्सर, हायवासारख्या अवजड वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. वर्दळीच्या रस्त्यांवर अशा वाहनांचा सुसाट वेग नागरिकांसाठी मात्र, कर्दनकाळ ठरत आहे. आयटी परिसरात महत्त्वाच्या आणि गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना बंदी असूनही, अनेक वाहनांची परिसरात बिनधास्तपणे वाहतूक सुरू आहे.
मागील काही महिन्यांत अनेकांचा बळी -
काही महिन्यापूर्वी हिंजवडीतील वडजाई नगर कॉर्नर येथे रेडिमिक्सची वाहतूक करणारा डम्पर पलटी झाल्याने, दोन युवतींचा नाहक बळी गेला होता. गणेशोत्सव दरम्यान सुद्धा अशाच अपघाताची पुनरावृत्ती आयटी पार्क फेज दोन ठिकाणी घडली होती. आयटी परिसरात आजपर्यंत अवजड वाहनांच्या धडकेत अनेकांचा नाहक बळी गेला आहे.
आयटी पार्कमधील रस्त्यावर पीकअवरला अवजड वाहनांना बंदी असूनही, कित्येक वाहनांची बिनधास्तपणे वर्दळ सुरू असते. ही शोकांतिका आहे. याकडे, पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.- सागर बिरारी (आयटीयन्स, हिंजवडी)
येथील रस्त्यांची अवस्था खूपच भयाण आहे. त्यामुळे, अपघातांना आयते निमंत्रण मिळते. त्यात, अवजड वहानांचा वेग सुसाट असतो. नियमांचे पालन होणं गरजेचे आहे. गर्दीच्या वेळी अशा वाहनांना बंदी घातली पाहिजे. - हरिनी कंदाळा ( सदस्य , प्लॅटिनम पार्क सोसायटी, माण)