- गोविंद बर्गेपिंपरी : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चऱ्होली, डुडुळगाव, किवळे, रुपीनगर या परिसरात अपुऱ्या आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. दिवसाआड मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा अस्थिर असून ठरावीक वेळाही निश्चित नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गृहिणींचा बराच वेळ पाणी भरण्यात जात असून नोकरी करणाऱ्या कुटुंबांना दररोज टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळा निश्चित नाहीत. शिवाय पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचा बराच वेळ पाणी भरण्यात वाया जातो. नोकरदार कुटुंबाला पुरेसे पाणी मिळत नाही. चऱ्होली येथील वडमुखवाडीतील पद्मावती नगरीत अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यातही भेदभाव केला जातो. याबाबत महापालिका अधिकारी आणि ‘सारथी’वर तक्रार केली असता दखल घेत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
डुडुळगावला वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे रहिवाशांसह व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. किवळे गावातील विकासनगरात कमी दाबाने पाणी येते. तेही काही वेळ सुरू राहते आणि अचानक बंद होते. पुन्हा तासाभराने पाणीपुरवठा सुरू होतो. पुरेशा दाबाने व ठरलेल्या वेळेनुसार पाणी मिळावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या पाण्याबाबत तक्रारी नाहीत. काही ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा किंवा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असेल तर त्याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करावी. - अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, महापालिका
चऱ्होलीच्या वडमुखवाडीतील पद्मावतीनगरीत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. दिवसाआड मिळणारे दोन तासांचे पाणी ८ नोव्हेंबरला केवळ एक तासच आले. उर्वरित पाणी इतर भागात वळविल्याने नियोजित पुरवठा झाला नाही. तक्रारीसाठी अधिकारी आणि सारथी हेल्पलाइन प्रतिसाद देत नाही. - वैभव तापकीस, सामाजिक कार्यकर्ते, वडमुखवाडी
रुपीनगर येथे दुपारी तीन ते रात्री नऊपर्यंत दिवसाआड ठरलेल्या वेळेत पाणीपुरवठा होतो. काही नागरिक जलवाहिनीला विद्युत मोटार लावतात. त्यामुळे काही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. - गोकुळ सातपुते, ज्येष्ठ नागरिक, रुपीनगर
किवळेतील विकासनगरमध्ये सकाळी ७.३० ला आलेले पाणी नऊ वाजता बंद होते. पुन्हा तासाभराने पाणीपुरवठा सुरू होतो. ते चार तास सुरू राहते. निश्चित वेळेत व पुरेशा दाबाने पाणी मिळावे. - शुभांगी कुंभार, विकासनगर, किवळे
डुडुळगावात वाढत्या लोकसंख्येनुसार पाणी मिळत नाही. दोन तास पाणी मिळणे गरजेचे असताना एक तास ३० मिनिटे तर कधी एक तास ४० मिनिटे पाणी मिळते. अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. - सचिन तळेकर, सामाजिक कार्यकर्ते, डुडुळगाव
Web Summary : Pimpri-Chinchwad residents face irregular, low-pressure water supply. Areas like Charholi and Dudulgaon struggle with inadequate water, disrupting daily life. Citizens demand consistent supply.
Web Summary : पिंपरी-चिंचवड के निवासियों को अनियमित, कम दबाव वाली जल आपूर्ति का सामना करना पड़ रहा है। चरholi और दुदुलगाँव जैसे क्षेत्रों में अपर्याप्त पानी की समस्या है, जिससे दैनिक जीवन बाधित हो रहा है। नागरिकों की मांग है कि आपूर्ति नियमित हो।